यासिन भटकळची भिस्त ‘इसिस’वर!

By Admin | Updated: July 5, 2015 03:13 IST2015-07-05T03:13:45+5:302015-07-05T03:13:45+5:30

देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपावरून अटक होऊन सध्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेच्या हैदराबाद येथील चेर्लापल्ली मध्यवर्ती

Yasin Bhatkal's trust is on ISIS! | यासिन भटकळची भिस्त ‘इसिस’वर!

यासिन भटकळची भिस्त ‘इसिस’वर!

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपावरून अटक होऊन सध्या
अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेच्या हैदराबाद येथील चेर्लापल्ली मध्यवर्ती कारागृहात असलेला ‘इंडियन मुजाहिदिन’चा म्होरक्या यासिन भटकळ याने ‘दमास्कसमधील मित्रांच्या मदतीने’ लवकरच आपण तुरुंगातून बाहेर येऊ, असे
पत्नीला मोबाइलवरून फोन करून सांगितल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थांना मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भटकळने तुरुंगातून मोबाइलवरून किमान १० वेळा बाहेरच्या व्यक्तींना फोन केले असून, त्याची फोनवरील ही सर्व संभाषणे ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने (आयबी) ‘टॅप’ करून त्याची माहिती हैदराबादमधील अधिकाऱ्यांना दिली आहे. दिल्लीत राहणाऱ्या पत्नीला केलेल्या या धक्कादायक फोनखेरीज भटकळने
इतर राज्यांमध्येही अनेक व्यक्तींना फोन केले होते; पण त्या व्यक्तींशी संभाषण होऊ शकले नव्हते.
भटकळची पत्नी झाहिदा आग्नेय दिल्लीतील जामिया नगरमध्ये राहते. तिला केलेल्या फोनवरील जे संभाषण ‘आयबी’ने ‘टॅप’ केले त्यात भटकळ तिला असे सांगताना ऐकू येते: ‘ अल्ला ताले के मर्जी से जल्दी ही निकल जाऊंगा. मै निकल जाऊंगा मेरे दमास्कसवाले दोस्तों के मदद से. फिर निकलने के बाद, हम जल्दी ही दमास्कस पहूँच जायेंगे.’
दमास्कस ही सीरियाची राजधानी आहे व कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याचा चंग बांधलेल्या ‘इस्लामिक स्टेट आॅफ सीरिया अँड इराक’ने (इसिस) सीरियामध्ये घट्ट पाय रोवून तेथील फार मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून तेथे आपले प्रशासन लागू केले आहे.
सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी असे मानतात की, भटकळच्या या संभाषणातील दमास्कसचा संदर्भ ‘इसिस’शी आहे. किंबहुना गुन्हेगारी जगतातील सांकेतिक भाषेत ‘इसिस’साठी वापरला जाणारा तो पर्यायी शब्द आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

‘हमारी जेल मे नामुमकीन...’
तेलंगण सरकारच्या कारागृह विभागाने शनिवारी सायंकाळी एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून भटकळने हा फोन चेर्लापल्ली तुरुंगातून करणे सर्वस्वी अशक्य असल्याचा ठाम दावा करण्यात आला. त्यात म्हटले की, न्यायालयाच्या आदेशानुसार भटकळला तुरुंगातील अधिकृत फोनवरूनच पत्नी व आईला फोन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी भटकळकडून टेलिफोन क्रमांक घेण्यात आले व त्यांची ‘आयबी’ आणि ‘एनआयए’कडून खात्री करून घेण्यात आली. आत्तापर्यंत भटकळने अशा प्रकारे २७ वेळा केलेल्या फोनवरील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले आहे. हे वृत्त आल्यानंतर शनिवारी ती संभाषणे पुन्हा पूर्णपणे ऐकण्यात आली; पण त्यात ‘इसिस’ किंवा दमास्कसचा कुठेही उल्लेख नाही.

10वेळा भटकळने तुरुंगातून मोबाइलवरून किमान बाहेरच्या व्यक्तींना फोन केले असून, त्याची फोनवरील ही सर्व संभाषणे ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने (आयबी)ने ‘टॅप’ करून त्याची माहिती हैदराबादमधील अधिकाऱ्यांना दिली आहे.
-‘इसिस’च्या सोशल मीडियावरून कट्टर धर्मवेडाचे भूत डोक्यात भरलेले भारतातील अनेक तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी लढण्याकरता गुपचूप देश सोडून तिकडे गेल्याची उदाहरणे याआधी घडली आहेत. भटकळच्या उपरोक्त संभाषणाची माहिती खरी असेल तर ती सुरक्षा यंत्रणांनी याआधी दिलेल्या इशाऱ्यांना बळकटी देणारी आहे.
-हैदराबादचे चेर्लापल्ली मध्यवर्ती कारागृह कडक सुरक्षा व्यवस्थेसाठी ओळखले जात असले तरी तेथील कैद्यांकडून मोबाइल फोन, सिम कार्ड व पेन ड्राईव्ह हस्तगत केल्या गेल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत.

आयबीचे लक्ष
भटकळचे झाहिदाशी २००८मध्ये लग्न झाले. त्यानंतर अल्पावधीच तो पत्नीपासून वेगळा राहत असला तरी तो तिच्याशी नेहमी संपर्कात असतो असे समजते.
तेहसीन उर्फ मोनूच्या माध्यमातून यासिन भटकळने १ लाख रुपये व मोबाइल फोन पत्नीला पोहोचविल्याचे आॅगस्ट २०१३मध्ये कळल्यापासून ‘आयबी’चे गुप्तहेर त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

भटकळला ज्या कडक सुरक्षेच्या कोठडीत ठेवले आहे तेथून त्याने मोबाइलवरून फोेन केला असणे सर्वस्वी अशक्य आहे. पण न्यायालयात नेतात तेव्हा कैद्यांवर तुरुंग व्यवस्थापनाचे नियंत्रण नसते. त्यामुळे अशा एखाद्या वेळी भटकळने हा फोन केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही आम्ही सतर्कता वाढविली असून तुरुंग परिसर ‘सॅनिटाईज’ करण्यात आला आहे.
- व्ही.के. सिंग, कारागृह महासंचालक, तेलंगण

Web Title: Yasin Bhatkal's trust is on ISIS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.