बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. ७ वर्षांनी भारतीय पंतप्रधान चीनमध्ये जात असल्याने भारत-चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दिशेने ही सुरुवात असल्याचं बोलले जाते. मात्र चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या एका सीक्रेट पत्रामुळे या संबंधांना सुरुवात झाली. ज्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याला निर्णायक वळण आले. मार्चमध्ये चीनसोबत अमेरिकेचा तणाव वाढला होता. त्यावेळी शी जिनपिंग यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांच्याशी संपर्क केला होता असा दावा ब्लूमबर्ग रिपोर्टने भारतीय अधिकाऱ्याच्या हवाल्याने केला आहे.
अमेरिकेबाबत व्यक्त केली चिंता
रिपोर्टमध्ये म्हटलंय की, हे पत्र अतिशय सावधगिरीने आणि जाणीवपूर्वक लिहिले गेले होते, ज्यामध्ये अमेरिकेच्या आर्थिक हालचालींबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी नवीन राजनैतिक उपक्रम प्रस्तावित करण्यात आले होते. जिनपिंग यांचे पत्र अशा वेळी आले जेव्हा अमेरिकेचा चीन आणि भारत या दोन्ही देशांवर व्यापार दबाव वाढला होता. पत्रात चिनी हितसंबंधांवर परिणाम करू शकणाऱ्या सर्व अमेरिकन करारांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यात राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देण्यात आली होती असंही सांगण्यात आले आहे.
त्यानंतर कशारितीने बॅकचॅनेल संवाद हा व्यापक चर्चेत बदलला. जूनपर्यंत नवी दिल्लीने बीजिंगसोबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली. मागील आठवड्यात दोन्ही बाजूने सीमावाद सोडवण्यापासून अनेक वादग्रस्त मुद्दे सोडवण्यावर सहमती दर्शवली. चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी भारताची भेट घेतली आणि सीमा विवाद सोडवण्यासाठी चर्चा केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ दरम्यान शांघाय सहकार संघटना (SCO) शिखर परिषदेसाठी चीनला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यात व्यापार आणि सीमा मुद्द्यांवर फोकस असेल.
दरम्यान, ट्रम्प यांनी २७ ऑगस्ट २०२५ पासून भारतावर ५०% शुल्क लादले, ज्याचे कारण रशियन तेल खरेदी आहे. यामुळे भारत नव्या व्यापार भागीदार शोधत असून, चीन, रशिया आणि ब्राझीलसह करार करण्यावर भर आहे. हे बदल जागतिक व्यापारात मोठे परिणाम घडवू शकतात, ज्यात भारत-चीन संबंध मजबूत होऊन अमेरिकेच्या प्रभावाला आव्हान मिळेल. मोदींच्या चीन दौऱ्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.