अहमदाबादेतील ‘एक्स’ चिन्ह घबराटीचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:47 IST2017-11-14T22:47:10+5:302017-11-14T22:47:10+5:30
अहमदाबाद शहरात बहुसंख्य हिंदू असलेल्या काही वसाहतींतील मुस्लिम कुटुंबांत त्यांच्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘एक्स’ असे चिन्ह असल्याचे पाहून रविवारी सकाळी घबराट निर्माण झाली होती.

अहमदाबादेतील ‘एक्स’ चिन्ह घबराटीचे कारण
अहमदाबाद : अहमदाबाद शहरात बहुसंख्य हिंदू असलेल्या काही वसाहतींतील मुस्लिम कुटुंबांत त्यांच्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘एक्स’ असे चिन्ह असल्याचे पाहून रविवारी सकाळी घबराट निर्माण झाली होती. चौकशीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वच्छता विभागाने ते चिन्ह रंगवले होते, असे स्पष्ट झाले.
पालदी भागातील अशा एका वसाहतीतील काही रहिवाशांनी सोमवारी निवडणूक आयोग आणि शहर पोलिस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस विभागाने तत्काळ तपास केला. राज्यात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’ चिन्ह लिहिण्यामागे त्या भागातील मुस्लिमांची ओळख पटण्याचा स्पष्ट उद्देश असल्याचे रहिवाशांनी पत्रात म्हटले होते. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर असे म्हटले आहे की ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमवर आधारीत असलेली कचरा गोळा करणारी यंत्रणा ज्या वसाहतींत पोहोचवायची त्यांची ओळख पटण्यासाठी ते चिन्ह रंगवण्यात आले आहे. अहमदाबाद महानगरपालिका कर्मचाºयांनी सोमवारी त्या भागाला आमच्यासह भेट देऊन रहिवाशांना ते आमच्या कचरा गोळा करण्याच्या प्रकल्पाचा भाग आहे, असे सांगितले, अशी माहिती पालदीचे पोलिस निरीक्षक बी. एस. राबडी यांनी दिली.