'अर्थव्यवस्थेचा पाया ढासळलाय, आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये भारत 27 वरुन 53 व्या स्थानवर'
By महेश गलांडे | Updated: February 3, 2021 15:14 IST2021-02-03T15:09:35+5:302021-02-03T15:14:53+5:30
देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय.

'अर्थव्यवस्थेचा पाया ढासळलाय, आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये भारत 27 वरुन 53 व्या स्थानवर'
मुंबई - कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण झाली असून कित्येकांना आपले रोजगारही गमावावे लागले आहेत. नुकतेच, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प 2021 सादर केला. त्यामध्ये, इन्फास्ट्रक्चर डेव्हलमेंटसह विविध योजनांना प्राधान्य देण्यात आलं आहे. देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तर, विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीका केलीय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, संरक्षण खात्याचं बजेट आणखी का वाढवलं नाही, असा सवालही उपस्थित केला होता.
देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय. एकीकडे अर्थव्यवस्थेची घसरण आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नसल्यानेच नान पटोले यांनी मोदी सरकार लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. ''देशाला महासत्ता बनविण्याचं स्वप्न दाखवून मोदी सरकारने गेल्या 6 वर्षांत देशाला कुठल्या रस्त्यावर आणून सोडलंय. आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये आपला देश 2020 मध्ये 27 व्या स्थानावरुन 53 व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. याचाच अर्थ, देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आणि लोकशाही मोडकळीस आलीय,'' असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
देश को महासत्ता का सपना दिखाकर मोदी सरकार ने देश को 6 साल में कैसी राह पर खड़ा किया आज हमारा देश अंतरराष्ट्रीय रैंकिंग (2020) में 27 वे स्थान से 53 वे स्थान पर चल गया. इस रैंकिंग का मतलब है देश का इकोनामी ढांचा व डेमोक्रेसी इस सरकार ने तोड दिया।
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 3, 2021
जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, ज्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांना कोरोनाचा तडाखा बसला आहे त्यामध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सनुसार, कोरोनाचा सगळ्यांत मोठा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. वादाचा, चर्चेचा मुद्दा हा नाही की कोरोनामुळे ज्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे त्यामध्ये भारत पहिल्या की दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची एवढी दुर्दशा झाली कशी? अर्थव्यवस्था एवढी रसातळाला कशी गेली?. तर, कोरोनाचं संकट आणि त्यामुळे प्रदीर्घ काळ लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर घाबरून आर्थिक घडामोडी स्थगित झाल्याने अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.