चिंताजनक - लढाऊ विमानांचा ताफा दशकभरातील नीचांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 17:25 IST2016-02-26T17:09:01+5:302016-02-26T17:25:39+5:30
भारतीय नौदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या अवघ्या 32 तुकड्या असून ही संख्या एका दशकातील नीचांकी आहे

चिंताजनक - लढाऊ विमानांचा ताफा दशकभरातील नीचांकावर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भारतीय नौदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या अवघ्या 32 तुकड्या असून ही संख्या एका दशकातील नीचांकी आहे. एका तुकडीत किंवा स्क्वाड्रनमध्ये सुमारे 20 लढाऊ विमानं असतात. भारतीय सैन्याला देशाच्या सीमांच्य़ा रक्षणासाठी 42 तुकड्यांची गरज असताना अवघ्या 32 तुकड्या तैनात असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसत आहे.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली असून लढाऊ विमानांच्या कमतरतेपोटी होत असलेल्या समस्येची चर्चा केली आहे. रशियन बनावटीच्या मिग 21 च्या तीन तुकड्या कालबाह्य झाल्यामुळे मोडीत काढल्यानंतर सध्या भारतीय हवाई दलाकडे शिल्लक असलेल्या लढाऊ विमानांच्या तुकड्यांची संख्या 32 वर आली आहे.
पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या पश्चिम व उत्तरेच्या सीमांच्या रक्षणासाठी भारताला 42 स्क्वाड्रन्सची गरज आहे. त्यातही 2020 पर्यंत सध्या ताफ्यात असलेल्या आणखी 14 तुकड्या निकामी होणार आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकार फ्रेंच बनावटीची राफेल आणि भारतीय बनावटीची तेजस ही लढाऊ विमाने भरती करण्याच्या तयारीत आहेत, परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही.
बहारीन मधल्या एअर शोमध्ये तेजस प्रदर्शित करण्यात आले, परंतु त्यास अद्याप वापरण्यायोग्य अशी अंतिम मंजुरी मिळालेली नाही. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानाच्या सज्जतेसाठी प्रयत्न करत आहे.