चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी केवळ महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राजकारणाला योग्य दिशा देण्याचेही काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिंदे यांचे कौतुक केले.
सरहदच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचेशरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आयुष मंत्री प्रतापराव जाधव, पद्मविभूषण राम सुतार, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, सरहदचे संजय नाहर, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे आणि लेशपाल जवळगे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे.
मावळ्यांना सोन्याचे कडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात रणांगणात कामगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना सोन्याचे कडे दिले जात होते. महादजी शिंदे यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सोन्याचे कडे आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली.
माझ्यावर गुगली टाकली नाहीमहादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना सदू शिंदे यांच्या जावयाच्या हातून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत मिळणे हा मोठा योगायोग आहे. शरद पवार हे फिरकीपटू सदू शिंदे यांचे जावई होत. पवार साहेब अशी गुगली टाकतात की ती कुणाच्या लक्षात येत नाही. पण, त्यांनी माझ्यावर कधी गुगली टाकली नाही आणि पुढेही टाकणार नाहीत अशी मला खात्री आहे, असे शिंदे म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.