नवी दिल्ली - अधिक काम केल्याचा कोणताही फायदा न देणे तसेच कामात लवचिकता न देता कामाच्या वेळेत वाढ केल्यामुळे कर्मचारी नाराज होत आहेत. जास्त तास काम केल्यास वैयक्तिक वेळेवर, आरोग्यावर आणि एकूणच जगण्यावर नकारात्मक परिणाम होईल, असे ४४% कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. ४० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जर त्यांना योग्य मोबदला दिला गेला तर ते जास्त वेळ काम करण्यास तयार आहेत. तर केवळ १६ टक्के कर्मचारी अशा बदलासाठी तयार असून, यातून उत्पादकता वाढेल, असे त्यांचे मत आहे.
अर्धे कर्मचारी सोडतील जॉब जिनिअस एचआरटेक (पूर्वीचे जिनिअस कन्सल्टंट्स) च्या ‘एक्स्टेन्डेड वर्क अवर्स अ डील ब्रेकर? , निअर्ली हाफ ऑफ एम्प्लॉइज वुड क्विट’ या अहवालासाठी जुलै दि. १ ते ३१ या काळात २,०७६ कर्मचाऱ्यांचा ऑनलाइन सर्वे करण्यात आला होता.
७९% कर्मचारी कामकाजाच्या वेळेत बदल करताना त्यांना चर्चेत सामील करून घेण्याची अपेक्षा करत आहेत. निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक आहे. त्यामुळे ताण कमी होईल, असे त्यांचे मत आहे.
बदलाला विरोध नाही, पण... : नवे कर्मचारी बदलाला विरोध करत नाहीत, मात्र त्यांना न्याय, सहानुभूती आणि संवाद हवा आहे. फक्त तास वाढविल्याने उत्पादकता वाढत नाही, तर कर्मचाऱ्यांची ऊर्जा कशी वापरली जाते हे महत्त्वाचे आहे, असे जिनियस एचआरटेकचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आर. पी. यादव यांनी म्हटले आहे.