महिलेने बिबट्यास घातले कंठस्नान!
By Admin | Updated: August 26, 2014 08:47 IST2014-08-26T04:21:28+5:302014-08-26T08:47:23+5:30
कमलादेवी नेगी नावाच्या एका ५६ वर्षांच्या महिलेने तिच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी कडवी झुंज देत अखेर त्याला ठार केले

महिलेने बिबट्यास घातले कंठस्नान!
रुद्रप्रयाग (उत्तराखंड) : कमलादेवी नेगी नावाच्या एका ५६ वर्षांच्या महिलेने तिच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी कडवी झुंज देत अखेर त्याला ठार केले आणि डोंगरी महिलांच्या साहसकथांमध्ये एका नव्या घटनेची भर पडली.
वन क्षेत्रपाल डी. एस. रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगावर रोमांच उभी करणारी ही घटना रविवारी सकाळी डेहराडूनच्या जाखोली उपविभागातील सेमकोटी गावात घडली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलादेवी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेली असता झुडपांमागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्ला केला. एरव्ही बिबट्या दूरवर दिसला तरी इतरांची बोबडी वळते. पण अंगावर चालून आलेल्या बिबट्याशी कमलादेवींनी धीराने झुंज दिली. आपण या हल्ल्यातून वाचत नाही, असे दिसल्यावर त्यांनी शेतात कामासाठी आणलेल्या कुदळ व विळ््याने बिबट्यावर प्रतिहल्ला चढविला. ही झुंज सुमारे १० मिनिटे सुरू होती. अखेर कमलादेवींच्या कुदळीचा एक घाव बिबट्याच्या डोक्यावर बसला व तो जमिनीवर कोसळला.
गावचे सरपंच जगदीश नेगी यांनी सांगितले की, थोड्याच वेळात इतर गावकरी तेथे पोहोचले व त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या कमलादेवींना लगेच आरोग्य केंद्रात हलविले. वनविभागास खबर दिल्यावर त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)