स्त्री - पुरुष कामगारांचा शेती महामंडळावर मोर्चा
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30

स्त्री - पुरुष कामगारांचा शेती महामंडळावर मोर्चा
> विविध मागण्यांसाठी शेतमजुरांचा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागपुणे : चवथ्या व पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, ८१ कोटींची थकीत देय रक्कम द्यावी, समान कामास समान वेतन दिले जावे, ५ वर्षांचा बोनस दिला जावा, या व अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध जिल्ह्यांतील स्त्री - पुरुष शेतमजुरांनी शेती महामंडळाचा परिसर आज दणाणून सोडला. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजिण्यात आला होता. चतु:श्रुंगी मंदिरापासून हा मोर्चा शिवाजीनगर परिसरातील शेती महामंडळाच्या आवारात आला. आनंद वायकर, सुभाष कुलकर्णर, पोपट मिटकरी, सुभाष गुरव, नारायण महानोर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. शेती महामंडळाच्या मालकीचे चौदा मळे राज्यात असून त्यावर काम करणा-यांपैकी नगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील स्त्री - पुरुष शेतमजुर मोठ्या संख्येने आंदोलनासाठी वाहनांतून आले होते. २००८ ते १२/१३ या दरम्यानचा ५ वर्षांचा बोनस दिला जावा, घरभाडेवाढीस दिलेल्या स्थगितीची अंमलबजावणी करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑगस्ट २०११ चा पगार द्यावा, रिक्त जागा भराव्यात, संयुक्त शेतीला दिलेली जमीन परत घ्यावी, कामगारांना पाच एकर जमीन व राहण्यासाठी दोन गुंठे जागा द्यावी, निलंबित कामगार प्रतिनिधी व अधिका-यांना कामावर घ्यावे आदी मागण्यांचा उहापोह या कामगारांच्या नेत्यांनी भाषणांमध्ये केला. आनंद वायकर, सुभाष कुलकर्णर, सुभाष काकुस्ते, भालचंद्र शिंदे, यांचा त्यात समावेष होता. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, तुकारामबुवा जगताप,अशोक पवार, दलित पंॅथर्सचे कार्याध्यक्ष घन:श्याम शेलार यांनी कामगारांना पाठिंबा व्यक्त केला. कायद्यातील तरतूदीनुसार जमीन ताब्यात येईपर्यंत महिलांनी आंदोलनात सक्रीय राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालकांनी संघटनेतील कामगार व पदाधिका-यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत व्यवस्थापकीय संचालकांनाच हटविण्याची मागणी आंदोलकांनी केली.