पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात महिला ठार, १००० भारतीयांचे स्थलांतर
By Admin | Updated: January 3, 2015 16:53 IST2015-01-03T16:53:53+5:302015-01-03T16:53:53+5:30
शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं सीमेवर आगळिक करणं सुरूच ठेवलं असून शनिवारी केलेल्या गोळीबारात एक महिला मृत्युमुखी पडली
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात महिला ठार, १००० भारतीयांचे स्थलांतर
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ३ - शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं सीमेवर आगळिक करणं सुरूच ठेवलं असून शनिवारी केलेल्या गोळीबारात एक महिला मृत्युमुखी पडली तर आठ जण जखमी झाले आहेत. कथुआ व सांभा जिल्ह्यातल्या सीमेवरील १३ ठिकाणी पाकिस्तानी सैन्यानं जोरदार गोळीबार केला. हा करताना पाकिस्तानी सैन्यानं भ्याडपणे नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले आणि परिणामी भारतीय नागरिक बळी पडले वा जखमी झाले आहेत. बारताने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.
सीमेवरील या गोळीबारामुळे हजारपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. याआधीही नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. त्याचा समाचार घेताना भारतीय सैन्यानं पाच पाकिस्तानी जवानांना ठार केलं. त्याआधी दोन महिन्यांपूर्वी पाकिस्ताननं भारतीय नागरी वस्त्यांवर केलेल्या गोळीबारात १३ जण ठार झाले होते तर ३२,००० नागरिक विस्थापित झाले.
गेल्या एका वर्षात पाकिस्ताननं ५५० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून भारतीय जवान तोडीस तोड प्रत्युत्तर देत असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षात पाच जवानांसह १९ जणांना प्राण गमवावे लागले तर १५० जण जखमी जाले.