सुरेखा यादव आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट
मध्य रेल्वे, भारतासह आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलटचा मान मला मिळाला याबद्दल मला आनंद आहे. आता रेल्वेतली माझी सेवा संपत असून, निवृत्तीची वेळ जवळ आली आहे. मागे वळून पाहताना माझ्या डोळ्यांसमोर एक संपूर्ण प्रवास उभा राहतो तो म्हणजे आव्हानांचा, संघर्षांचा, पण त्याहूनही जास्त समाधानाचा.
साताऱ्यातील शेतकरी कुटुंबातून मी आले. लहानपणी इंजिनाची शिट्टी ऐकली की गाडीकडे पाहत राहायची. पण, कधी वाटले नव्हते की एक दिवस मीच त्या गाडीचा ताबा घेईन. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि रेल्वेची मी १९८८ साली परीक्षा दिली. परंतु माझा रेल्वेत नोकरीचा उद्देश नव्हता. किंबहुना माझी निवड होईल असे सुद्धा मला वाटले नव्हते. १९८९ मध्ये मध्य रेल्वेत सहाय्यक लोको पायलट म्हणून रुजू झाले. त्या दिवशी खरे तर केवळ माझ्या आयुष्यातच नाही, तर आशिया खंडाच्या रेल्वे इतिहासातही नवा अध्याय लिहिला गेला. सुरुवातीच्या काळात अनेकांनी प्रश्न विचारले. महिलेने एवढे कष्टाचे काम कसे करायचे? वेळी अवेळी ट्रेन चालवणे शक्य आहे का? असे ते प्रश्न होते. पण माझे उत्तर नेहमी एकच होते-जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही.
कसारा-इगतपुरी घाट विभागातील वळणावळणाचा, कठीण आणि उतार-चढाव असलेला मार्ग चालवताना माझ्या क्षमतेची खरी कसोटी लागली. इंजिनाच्या प्रत्येक आवाजाशी मैत्री केली आणि त्यातूनच आत्मविश्वास वाढत गेला.
मला अनेक अवॉर्ड मिळाले. ‘जिजाऊ पुरस्कार’पासून, ‘लोकमत सखी मंच’ ते भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडून ‘फर्स्ट लेडीज अवॉर्ड’. माझ्या आयुष्यातील हे सर्वांत महत्त्वाचे क्षण आहेत. सोबतच ट्रेन चालविण्याचा सर्वांत अविस्मरणीय क्षण म्हणजे २०१० मध्ये डेक्कन क्वीन आणि २०१८ मध्ये राजधानी एक्स्प्रेस चालवण्याचा सन्मान. लाखो लोकांची नजर माझ्याकडे होती, पण माझ्या मनात फक्त एकच विचार होता-माझे काम म्हणजे ट्रेन वेळेवर आणि सुरक्षित पोहोचविणे. वंदे भारत, मुंबई लोकल अशा पॅसेंजर आणि मालगाड्या चालविण्याचा अनुभव तितकाच संस्मरणीय ठरला.
प्रत्येक गाडीने मला नवे अनुभव दिले. मी ट्रेन चालविली. हो, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे सर्व महिलांसाठी नकळत माझ्यामार्फत एक दार उघडले. आज अनेक महिला लोको पायलट, गार्ड, अभियंते रेल्वेत काम करत आहेत, आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून मला समाधान मिळते. प्रशिक्षण वर्गात जेव्हा मी नवीन पिढीला मार्गदर्शन करायचे, तेव्हा त्यांच्यातल्या उत्साहात मला माझ्या पहिल्या दिवसाची आठवण व्हायची.
आज जेव्हा माझा रेल्वेतील प्रवास संपत आला आहे, तेव्हा मनात एकच गोष्ट आहे – अभिमान. रेल्वे फक्त नोकरी नव्हती, ती माझी जीवनवाहिनी होती. माझ्या इंजिनाच्या शिट्टीत माझे हृदय धडकत होते. आता मी थांबते आहे, पण मागे वळून पाहताना असंख्य अनुभव, मैलोनमैलचा प्रवास आणि हजारो प्रवाशांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. मी एक साधी शेतकरी मुलगी होते, पण आज आशिया खंडाची पहिली महिला लोको पायलट म्हणून ओळखली जाते. म्हणूनच प्रत्येक तरुणीला हे सांगू इच्छिते – स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवा. आव्हाने कितीही असली, तरी प्रयत्नांनी रुळांवरून ट्रेनप्रमाणेच आपले आयुष्यही पुढे नक्कीच धावेल.(शब्दांकन : महेश कोले)
Web Summary : Surekha Yadav, Asia's first woman loco pilot, reflects on her challenging yet fulfilling journey from a farmer's daughter to a trailblazer in the railway industry, inspiring women to pursue their dreams with courage and determination. Her legacy transcends the railway.
Web Summary : सुरेखा यादव, एशिया की पहली महिला लोको पायलट, एक किसान की बेटी से रेलवे उद्योग में अग्रणी बनने तक की अपनी चुनौतीपूर्ण लेकिन संतोषजनक यात्रा पर विचार करती हैं, महिलाओं को साहस और दृढ़ संकल्प के साथ अपने सपनों को पूरा करने के लिए प्रेरित करती हैं। उनकी विरासत रेलवे से परे है।