मध्य प्रदेशातील एका महिलेने पक्क्या रस्त्याची मागणी केली असता, भाजप खासदार भलतेच बरळले आहेत. यावर, खासदार राजेश मिश्रा म्हणाले, संबधित महिलेने डिलिव्हरीची तारीख सांगावी, उचलून रुग्णालयात दाखल करू. आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे.
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील लीला साहू रस्त्याची मागणी घेऊन, सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता याच संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर भाजप खासदार राजेश मिश्रा यांनी त्यांना विचित्र सल्ला दिला आहे. खासदार म्हणाले, जर त्यांनी डिलिव्हरीची तारीख सांगितली, तर आम्ही त्यांना उचलून रुग्णालयात दाखल करू. आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. लीला साहू यांनी एक व्हिडिओ जारी करत, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारला होता.
लीला साहू यांनी यापूर्वीही एक व्हिडिओ तयार करत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच रस्त्याची मागणी केली होती. तेव्हाही त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता. आता, लीला साहू या गर्भवती आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा गावातील इतर गर्भवती महिलांसोबत असाच एक व्हिडिओ तयार करून रस्त्याची मागणी केली आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावरही टीका केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
सिधीचे खासदार डॉ. राजेश मिश्रा यांना माध्यमांनी लीला साहू यांच्या व्हिडिओसंदर्भात प्रश्न केला असता, त्यांनी अत्यंत विचित्र उत्तर दिले. ते म्हणाले कालजीचे कारण नाही. आमच्याकडे रुग्णवाहिका आहे, रुग्णालय आहे, आशा कार्यकर्ताही आहेत, आम्ही व्यवस्था करू. डिलिव्हरीची एक संभाव्य तारीख असते, जर त्यांनी आम्हाला सांगितली, तर आम्ही त्यांना एक आठवडा आधीच उचलू आणि रुग्णालयात दाखल करू.
ते पुढे म्हणाले, आपण रस्ते बांधत नाही, तर अभियंते बांधतात. कंत्राटदार बांधतात. खासदार राजेश मिश्रा या रस्त्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरत आहेत. मात्र, गेल्या वेळी भाजपच्या रीती पाठक सिधीच्या खासदार होत्या.