नव-याने प्रियकराची हत्या केल्यानंतर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: January 14, 2017 15:13 IST2017-01-14T15:13:11+5:302017-01-14T15:13:11+5:30
प्रियकराची हत्या केल्यानंतर निराश झालेल्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उत्तर बंगळुरुतील लॉजमध्ये घडली.

नव-याने प्रियकराची हत्या केल्यानंतर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 14 - नव-याने आणि सास-याने मिळून प्रियकराची हत्या केल्यानंतर निराश झालेल्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उत्तर बंगळुरुतील लॉजमध्ये घडली. श्रुती गौडा (32) असे मृत महिलेचे नाव असून ती दोन मुलींची आई आहे. श्रुती आणि तिचा प्रियकर अमित केशवमुर्ती (34) रेल्वे गोल्लाहल्ली येथे एकत्र गाडीमध्ये बसलेले असताना त्यांच्या मागावर असलेले गोपळक्रिश्न (78) आणि राजेश गौडा (33) तिथे आले. राजेश गौडा श्रुतीचे पती आहेत.
राजेशने गाडीच्या दरवाजावर लाथा मारुन दोघांना बाहेर येण्यास सांगितले. तेवढयात अमितवर गोळया झाडल्या. श्रुतीने तशीच गाडी पळवून सप्तागिरी रुग्णालयाकडे आणली. जखमी अमितला तिने रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी तिला काही रक्कम आणि रक्ताची व्यवस्था करायला सांगितले. वरिष्ठ डॉक्टरांनी अमितचा मृत्यू झाल्याचे श्रुतीला सांगितले.
श्रुती तशीच नेसारा लॉजमध्ये गेली. तिने आपल्या नातेवाईकांना फोन करुन रुम नं 301 मध्ये असल्याचे सांगितले. नातेवाईक तिथे आल्यानंतर त्यांनी वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून दार उघडले नाही. दुस-या किल्लीने दरवाजा उघडल्यानंतर श्रुतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. अमितही विवाहीत होता त्याला तीन वर्षांचा मुलगा आहे.