उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आहे. देशभरातील कोट्यवधी भाविकांनी महाकुंभ निमित्त प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. तसेच देशाच्या राष्ट्रपदी दौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अनेक प्रमुख राजकीय नेते आणि इतर महनीय व्यक्तींनीही महाकुंभनिमित्र पवित्र स्नान केलं. मात्र मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील काही अपवाद वगळता बहुतांश नेते महाकुंभमेळ्यापासून दूर राहिल्याचे दिसून आले. आता महाकुंभमेळ्याचे शेवटचे काही दिवस उरले असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रायबरेली दौऱ्यावेळी ते महाकुंभमेळ्यात स्नान करणार का? असे विचारले असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
रायबरेलीच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी बछरावां येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपाने जीएसटी आणि नोटाबंदी लागू करून देशात बेरोजगार वाढवले, असा आरोप केला. तसेच केंद्र सरकारने प्रामाणिकपणे काम केलं तर देशातील कोट्यवधी तरुणांना रोजगार मिळू शकतो, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांना ते महाकुंभमध्ये जाणार का, असं विचारलं असता, ते केवळ ‘’नमस्कार’’ असं म्हणून पुढे निघून गेले.
दरम्यान, रायबरेली दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बहुजन समाज पार्टी आणि मायावतींसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं. मायावती आमच्या सोबत असत्या तर भाजपा कधीच जिंकू शकला नसता, असं राहुल गांधी म्हणाले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राहुल गांधी यांचा हा रायबरेली मतदारसंघातील चौथा दौरा आहे. लखनौ विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी रस्ते मार्गाने रायबरेली येथे पोहोचले. तिथे त्यांनी मारुती मंदिरामध्ये पूजा केली. त्यानंतर राहुल गांधी मूल भारती वसतीगृहात गेले. तिथे त्यांनी दलित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना बसपाच्या प्रमुख मायावती यांचं कौतुक केलं.
तो विद्यार्थी म्हणाला की, कांशीराम यांनी दलितांसाठी काम केलं. त्यानंतर मायावती यांनी त्यांचं काम पुढे नेलं. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, कांशीराम यांनी पाया रचला, तर मायावती यांनीही भरपूर काम केलं, असं मी समजतो. मात्र आजकाल त्या योग्य पद्धतीने निवडणूक लढवत नाही आहेत.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, मायावती यांनी आमच्यासोबत मिळून लोकसभेची निवडणूक लढवावी, असं आम्हाला वाटत होतं. मात्र त्यांनी काही कारणांमुळे आमच्यासोबत हातमिळवणी केली नाही. जर सपा, बसपा आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले असते तर भाजपा कधीही जिंकू शकला नसता, असा दावा त्यांनी केला.