‘आप’भेद आज मिटणार?
By Admin | Updated: March 4, 2015 00:08 IST2015-03-04T00:08:10+5:302015-03-04T00:08:10+5:30
पक्षातील काही बड्या नेत्यांमुळे आम आदमी पार्टीचे संयोजक व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कमालीचे व्यथित आहेत़

‘आप’भेद आज मिटणार?
नवी दिल्ली : दिल्लीकरांनी दाखवलेल्या विश्वासाला जागण्यापेक्षा अंतर्गत कारवायांत व्यग्र असलेल्या पक्षातील काही बड्या नेत्यांमुळे आम आदमी पार्टीचे संयोजक व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कमालीचे व्यथित आहेत़ मंगळवारी टिष्ट्वटरवर त्यांनी आपल्या वेदना उघड केल्या़ शिवाय अशा गलिच्छ राजकारणात आपल्याला काहीच रस नसल्याचेही स्पष्ट केले़
पक्षात सध्या जे काही सुरू आहे, ते माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी आणि व्यथित करणारे आहे़ दिल्लीच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे़, अशा आशयाचे टिष्ट्वट केजरीवाल यांनी केले आहे़ मी या गलिच्छ राजकारणात पडू इच्छित नाही़ त्याऐवजी मी दिल्लीतील कारभारावर लक्ष केंद्रित करील़ कुठल्याही स्थितीत दिल्लीच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे़
केजरीवाल यांना पक्षाच्या संयोजक पदावरून हटविण्यासाठी आम आदमी पार्टीचे दोन बडे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केजरीवालांविरुद्ध उघड मोर्चेबांधणी सुरू केल्याचा आरोप होत आहे़ यावरून आपमध्ये तीव्र मतभेद उघड झाले आहेत़
आज होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीकडे सर्वांच्या नजरा
पक्षातील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे़ या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध पक्ष काय कारवाई करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़ दिल्ली निवडणूक काळात योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप होत आहे़ याची गंभीर दखल घेत, या दोघांची पक्षाच्या संसदीय कामकाज समितीतून हकालपट्टी होऊ शकते, अशी शक्यता मीडियाने वर्तवली आहे़ दरम्यान, प्रशांत भूषण यांनी काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला हजर राहणे शक्य नसल्याचे म्हटले आहे़
(लोकमत न्यूज नेटवर्क)
पक्षातील अंतर्गत कलहावर केजरीवालांनी तीव्र दु:ख व्यक्त केल्यानंतर त्यांचे निकटस्थ मानले जाणारे आप नेते आशुतोष आणि आशिष खेतान मंगळवारी उघडपणे प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध मैदानात उतरले़
पक्षाचे संरक्षक शांती भूषण तसेच त्यांचे चिरंजीव प्रशांत आणि कन्या शालिनी पक्षावर ताबा मिळवू इच्छितात, असे टिष्ट्वट खेतान यांनी केले आहे़ वन मॅन पार्टी असल्याचा आरोप करणारेच एका कुटुंबाचा पक्ष बनवू इच्छित आहेत, असे आणखी एक टिष्ट्वटही त्यांनी केले आहे़
आशुतोष यांनीही भूषण यांच्यावर ताशेरे ओढले आहेत़ प्रशांत यांनी व्यक्तिनिष्ठेचा मुद्दा मीडियासमोर उपस्थित करण्याऐवजी उद्या होऊ घातलेल्या कार्यकारिणी बैठकीत उपस्थित करावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे़