नवी दिल्ली : मान्सूनपूर्व वादळामुळे आसाममधील चहाच्या उत्पादनात १५ टक्क्यांची घट झाल्यामुळे चहाचे दर वाढण्याची शक्यता आहे.मान्सूनपूर्व अवकाळी पावसाबरोबरच कोरोना संक्रमणामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने वाहतुकीचे संकट आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहा उद्योगांसमोर निर्माण केले आहे. मंदी आणि लॉकडाऊन यामुळे कर्मचारी रजेवर आहेत. चहा मळ्यांच्या ठिकाणी वाढत असलेले कोरोना संक्रमण व आता खराब हवामान असा दुहेरी मार चहा व्यवसायाला बसत आहे. लिलाव प्रक्रियेत आलेली शिथिलता व वितरणात आलेली समस्या यामुळे चहा उद्योगावर दूरगामी व अत्यंत प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएआय) सरचिटणीस प्रबीर भट्टाचार्य यांनी सांगितले की, ‘आम्ही यावर्षी नव्याने सुरुवात होण्याची अपेक्षा केली होती. तथापि, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ही शक्यता कमजोर झाली आहे.’ टी बोर्ड इंडियाच्या आकडेवारीनुसार, मार्च आणि एप्रिलमध्ये आसाममधील उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. मार्च २०१९ च्या तुलनेत हे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी कमी आहे. पुढील काही आठवड्यांत सरासरी पावसाची अपेक्षा आहे; परंतु चहाच्या झुडपांना उन्हाळ्यात पावसाळ्याच्या आगमनापर्यंत स्थिर पाऊस पडणे आवश्यक असते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, भारताने स्थिर मान्सूनचा अखेरचा अनुभव १९९६ ते १९९८ च्या दरम्यान सलग तीन वर्षे घेतला होता.
आसामात चहा उत्पादन घटल्याने किमती वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST