Uddhav Thackeray Raj Thackeray India Alliance: "आम्हाला काय करायचं आहे, हे ठरवण्यासाठी आम्ही दोघं समर्थ आहोत. आम्हाला काय करायचं आहे, ते आम्ही दोघं करू. त्यासाठी तिसऱ्याची गरज नाही", असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबतच्या युतीबद्दल भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंडिया आघाडी विखुरलेली दिसत आहे. आप बाहेर पडली आहे. ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे. महाराष्ट्रातील राजकारण बदल आहे. दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना (यूबीटी) इंडिया आघाडीत राहणार का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला.
ते म्हणाले, "अशा काही अटी-शर्ती नाहीयेत. मी म्हटलं आहे की आम्हा दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत."
भाजपने मराठी उमेदवार दिला तर...
उपराष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यापूर्वी शिवसेनेने मराठी उमेदवार असल्यामुळे विरोधी आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्याचबद्दल ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. एनडीएने मराठी उमेदवार दिला तर पाठिंबा देणार का?
या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, "आपण या सगळ्या शक्यतांवर जेव्हा उमेदवार जाहीर होतील, तेव्हा बोलूयात. कारण उगाच आपण त्यांच्या मनात काय आहे, यावर कशाला बोलायचे? जेव्हा तो विषय समोर येईल, तेव्हा बघू."
"पहिला प्रश्न असा आहे की उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढलं? माजी उपराष्ट्रपती महोदय आता कुठे आहेत? हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे त्यावर चर्चा झाली पाहिजे. दोन-तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले, ते आता कुठे आहेत? यावर चर्चा झाली पाहिजे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीक केली होती. त्यावर ठाकरे म्हणाले, "त्यांच्या टीकेला उत्तर द्यावं, एवढे काही ते महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दारच असतो. त्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील, तर त्यावर आपण काय बोलू शकतो?", असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.