काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार घोटाळ्यावरुन गंभीर आरोप केले होते. यावेळी त्यांनी कर्नाटकातील 'शकुनी राणी' यांचे नाव घेत डबल व्होटर असल्याचा आरोप केला. या प्रकरणी आता कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्याकडून लावण्यात आलेल्या मतदार घोटाळ्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण आणि पुरावे मागितले आहेत. हे पत्र राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून लिहिले आहे.
'तुम्ही ७ ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की तुम्ही दाखवलेली कागदपत्रे भारतीय निवडणूक आयोगाच्या नोंदीतील आहेत. तुम्ही म्हटले होते की हा निवडणूक आयोगाचा डेटा आहे आणि असेही म्हटले होते की मतदान अधिकाऱ्याने दिलेल्या नोंदीनुसार, शकुन राणीने दोनदा मतदान केले आहे. तुम्ही मतदार ओळखपत्र दाखवले आणि सांगितले की त्यावर दोन टिक मार्क्स आहेत, हे टिक मार्क्स मतदान केंद्र अधिकाऱ्याचे आहेत", असे कर्नाटकच्या सीईओंनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने चौकशी केली
'तपासादरम्यान, शकुन राणी यांनी तुमच्या आरोपानुसार, दोनदा नव्हे तर फक्त एकदाच मतदान केल्याचे म्हटले आहे. आमच्या कार्यालयाने केलेल्या प्राथमिक तपासणीत असेही दिसून आले आहे की तुमच्या सादरीकरणात दाखवलेला टिकमार्क केलेले कागदपत्र मतदान अधिकाऱ्यांनी जारी केलेले कागदपत्र नाही. म्हणून, तुम्हाला विनंती आहे की ज्या आधारावर तुम्ही शकुन राणी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने दोनदा मतदान केले आहे असा निष्कर्ष काढला आहे ते संबंधित कागदपत्रे आम्हाला द्या, जेणेकरून आमच्या कार्यालयाकडून सविस्तर चौकशी करता येईल, असंही यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले.
राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर मतदार यादीत अपात्र मतदारांचा समावेश करून पात्र मतदारांना वगळल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना कर्नाटकच्या सीईओंनी एक निवेदन जारी केले. 'निवडणुकांच्या संदर्भात, निवडणूक निकालांना उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेद्वारेच आव्हान दिले जाऊ शकते.