- पोपट पवारतिरूवनंतपुरम : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणुकीच्या मैदानात उतरावे, या मागणीला जोर धरत असून, राहुल यांनी वायनाडची निवड केल्यास काँग्रेसचा दक्षिणेत प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. वायनाडमधून लोकसभा लढविल्यास केरळबरोबरच तामिळनाडू व कर्नाटकातही काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरिणांकडून वर्तविला जात आहे. यासाठीच राहुल यांना दक्षिणेच्या मैदानावर आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.राहुल गांधी यांनी याबाबत अद्यापही कोणताच निर्णय घेतलेला नाही. नरेंद्र मोदी यांनी २0१४ साली वाराणसी व वडोदरामधून निवडणूक लढविली होती. भाजपासाठी हा निर्णय फायद्याचा ठरला होता. त्यामुळे केरळ काँग्रेसने राहुल यांना गळ घातली आहे. वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कोळीकोड (कालिकत), वायनाड आणि मलप्पूरम या तीन जिल्ह्यांतील सात विधानसभा मतदारसंघ त्यात येतात.येथील ९३.१५ टक्के जनता ग्रामीण, तर ६.८५ टक्के जनता शहरी आहे. पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. काँग्रेसच्या एम. आय. शनवास २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा जिंकली आहे.गांधी कुटुंबीयांचा दक्षिणेवर विश्वासगांधी घराण्याने याआधी कर्नाटकातील बेल्लारी, चिकमंगलूर आणि आंध्रमधील मेडक मतदारसंघांतून दिल्ली गाठली आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये चिकमंगलूर, तर सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये बेल्लारी येथून निवडणूक लढविली होती. राहुल यांनी वायनाड मतदारसंघाची निवड केली तरी दक्षिणेतील स्वारी त्यांच्यासाठी नवी नसेल.
राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून उभे राहणार?, दक्षिणेत काँग्रेसला बळकटी आणण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:45 IST