गुवाहाटी : भारत-पाकिस्तानच्या वाटाघाटींमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करू देणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत गुवाहाटी येथे बांधलेल्या घरांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र कोणी कुरापत काढली तर आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कारवाई करताना पाकिस्तानी नागरिक किंवा त्यांच्या लष्कराला लक्ष्य न करता फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. (वृत्तसंस्था)
आम्हाला युद्ध नको...पाकिस्तानने केलेला क्षेपणास्त्रे, ड्रोनचा माराही भारताने निष्फळ ठरविला. भारताला युद्ध नको आहे, मात्र आम्ही दहशतवादी कारवाया अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाला रोखणे व पाकव्याप्त काश्मीर या दोन मुद्द्यांवरच भारताची पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते.
‘ऑपरेशन सिंदूरबाबत संभ्रम निर्माण करू नका’भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानिमित्त उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. त्यात नक्वी सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आपल्या सैन्याने दहशतवादी, त्यांना समर्थन देणाऱ्यांना धडा शिकवला.