लोकमत न्यूज नेटवर्क, नवादा : निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात ‘मतचोरी’साठी हातमिळवणी झाली आहे. मात्र, बिहारमध्ये ‘महागठबंधन’ एकाही मताची चोरी होऊ देणार नाही, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले.
बिहारमधील मतदार अधिकार यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादामधील भगतसिंह चौक येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला आहे. केंद्र सरकार, निवडणूक आयुक्त हा अधिकार तुमच्याकडून हिरावून घेत आहेत.
राहुल गांधी म्हणाले, तेजस्वी यादव, मी आणि इतर महागठबंधन नेते सांगू इच्छितो की, आम्ही बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपने हरयाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील निवडणुकांची चोरी केली. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान जादूच्या कांडीने १ कोटी नवीन मतदार जोडले गेले, अशी टीकाही त्यांनी केली.