लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ला झाला, तर ती युद्ध पुकारल्याची कृती मानली जाऊन प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्र सरकारने शनिवारी पाकिस्तानला दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरोधात २०१४ पासून मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसारच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर पाकने भारताच्या उत्तर व पश्चिम सीमांवर लष्करी तळासह नागरी भागांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने त्याला प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
पहलगामप्रमाणेच पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी गटांनी भारतात हल्ला केला, तर त्याचा प्रतिकार करू, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.