कामानिमित्त ये-जा करताना अचानक पत्नीच दुसऱ्यासोबत दिसली तर पती काय करेल? काही वर्षांपूर्वी एका पतीने पत्नीच्या ड्रेसवरून चेहरा झाकलेल्या पत्नीला ओळखले होते. एकाच रस्त्याने जात असताना पत्नी दुसऱ्याच व्यक्तीच्या मोटरसायकवरून चेहरा झाकून जात होती. असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडला आहे. पतीने पत्नीला एका कारमध्ये पाहिले आणि त्यांना थांबविण्यासाठी त्याने थेट बोनटवरच उडी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कटघर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. महिलेच्या पतीने आपल्याला तिच्यासोबत पकडल्याचे पाहून त्या कारमध्ये बसलेल्या तिच्या प्रियकराने तशीच कार पाच किमीपर्यंत पळविली. हायवेवर हा थरार रंगला होता. काही लोकांनी याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यानंतर पोलिसांना समजताच त्या पोलिसांनी कारला ट्रेस करत कार ताब्यात घेतली आहे.
बिलारीच्या तरुणाचे त्याच भागातील एका तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्यात वाद झाला आणि पत्नी वेगळी राहत होती. बुधवारी रात्री पती काही कामानिमित्त तिच्या गावातून जात होता. यावेळी त्याला आपल्या पत्नीसारखी महिला एका कारमध्ये बसलेली दिसली. यामुळे त्याने ती कार रोखण्यासाठी कारच्या बोनटवर उडी मारली. तरीही कार चालकाने कार दामटवली. ही कार तो मुरादाबाद-आग्रा हायवेवर घेऊन गेला, तिथे त्याने ती कार पाच किमीपर्यंत चालविली. अन्य वाहनचालकांच्या काहीतरी काळाबेरा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू, तो तसाच सुसाट पुढे जात राहिला. महिलेचा पती बॉनेटवरच होता.
पाच किमी अंतर गेल्यावर एका कारचालकाने त्याला ओव्हरटेक करून कार थांबवायला भाग पाडले. हा प्रकार पोलिसांना समजला आहे, त्यांनी कार ताब्यात घेतली आहे. परंतू, तक्रार आल्याशिवाय पुढील कारवाई केली जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.