हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : जवळजवळ दररोज संसदेत गोंधळ घालून आणि घोषणाबाजी करून विरोधकांनी देशासमोर स्वतःला ‘उघड’ केले आहे. जे स्वतःची कबर खोदत आहेत, त्यांना आपण का थांबवावे? विरोधक स्वतःच्या पायावर धोंडा मारत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
एनडीए संसदीय पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, जर ते खरे भारतीय असतील तर ते असे म्हणाले नसते की, चीनने भारतीय भूभागावर कब्जा केला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संरक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणा, तसेच पाकविरोधातील कारवाईमध्ये तिन्ही सैन्यदलांमध्ये साधलेली एकात्मता याचीही नेत्यांनी प्रशंसा केली.
बैठकीत ‘एनडीए’ने मोदींच्या ‘अढळ निर्धार, दृढनिश्चय आणि नेतृत्वाची’ प्रशंसा करत ठराव मंजूर केला. ठरावात म्हटले आहे की, त्यांचा निर्णायक संकल्प, दूरदर्शी नेतृत्व आणि दृढ नियंत्रणाने देशाला दिशा दिली आहे आणि सर्व भारतीयांच्या मनात अभिमान आणि ऐक्याची भावना जागविली आहे.
‘एनडीए’च्या ठरावात तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेखभारतात दहशतवादी हल्ला झाल्यास योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, तेही आपल्या अटींवरच. भारत आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांच्यात फरक करणार नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांनी भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले. ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा घडवून आणल्याचा पश्चाताप विरोधी पक्षांना होत असेल.