४६० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी ललित मोदीना का मदत केली - काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
By Admin | Updated: August 12, 2015 13:27 IST2015-08-12T13:27:15+5:302015-08-12T13:27:57+5:30
ललित मोदींनी आयपीएल घोटाळा प्रकरणात ४६० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप असताना त्यांना तथाकथित मानवतावादी दृष्टीने सुषमा स्वराज यांनी का केली याचा खुलासा व्हायलाच हवा

४६० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी ललित मोदीना का मदत केली - काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - ललित मोदींनी आयपीएल घोटाळा प्रकरणात ४६० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप असताना त्यांना तथाकथित मानवतावादी दृष्टीने सुषमा स्वराज यांनी का केली याचा खुलासा व्हायलाच हवा, तसेच भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे ललित मोदींशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेच्या अधिवेशनात भाजपावर घणाघाती हल्ला चढवला.
पावसाळी अधिवेशनाचा आत्तापर्यंतचा काळ वाया गेला असून अखेरचे तीन दिवस शिल्लक असताना काँग्रेसने गोंधळ संपवत चर्चेचा मार्ग स्वीकारला. लोकसभा अध्यक्षांनी ललितगेट प्रकरणावर बोलण्यासाठी १५० मिनिटांचा कालावधी दिला आहे. जर ललित मोदींच्या आजारी पत्नीला मदत करायची होती तर सुषमा स्वराज यांनी कायद्याच्या मार्गाने मदत करायला हवी होती त्यासाठी कायदा गुंडाळून ठेवायची काय गरज होती असा सवाल स्वराज यांना खर्गे यांनी विचारला आहे.
ललित मोदींच्या व्हिसासाठी ब्रिटीश सरकारला फोनवरून बोलताना स्वराज यांनी आपली हरकत नसल्याचे कळवले आणि भारतात अर्थखात्याला चौकशीसाठी हवा असलेल्या एका आरोपीला मदत केल्याचे स्पष्ट होत असल्याचे खर्गे यांनी सांगितले. खर्गे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
- जर सुषमा स्वराज यांना मोदींना मदत करायची होती तर त्यांनी मोदींना भारतात बोलवायला हवे होते. उच्चायुक्त, सेक्रेटरी कोणालाही न कळवता सुषमा यांनी मोदींना मदत केली. कायद्याचे उल्लंघन करत मदत करणे हा मोठा गुन्हा.
- जर तुम्हाला माणुसकीच्या दृष्टीने मदत करायची होती तर ती कायद्याच्या चौकटीत राहून करायला हवी होती.
- परराष्ट्र मंत्र्यांनी मोदींच्या पासपोर्टविरोधात कोर्टात अपील का केले नाही?.
- ज्या व्यक्तीविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली, त्यांना स्वराज यांनी मदत का केली ?.
- ललित मोदींकडून सुषमा स्वराज यांना आर्थिक लाभ झाला आहे.
- पंतप्रधान फक्त रेडिओ, टीव्हीवरच बोलतात, सदनात का नाही?.
- लोकसभेतील गोंधळाला सरकारच जबाबदार. सरकार याआधीच चर्चेला तयार झाले असते तर संसदेचे इतके दिवस वाया गेले नसते.
- आम्ही लोकसभेत गोंधळ घालण्याच्या विरोधात.