राजस्थानमधील भरतपूर येथील महाराजा सूरजमल बृज विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. येथे एका विद्यार्थ्याने विद्यापीठाचे कुलगुरू रमेशचंद्र यांना मध्येच अडवून आपली पदवी रद्द करण्यामागचं कारण विचारलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांतीय संमेलनादरम्यान, ही घटना घडली. या कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुलगुरूंना जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव विष्णू खैमरा असून, तो अभाविपचा कार्यकर्ता आणि विद्यार्थी नेता आहे. कुलगुरू रमेशचंद्र यांनी व्यक्तिगत द्वेषामुळे त्याची पदवी रद्द केली, असा आरोप त्याने केला. विष्णू याने सांगितलं की, मी २०२० मध्ये माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मात्र विद्यापीठामधील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागणीबाबत केलेल्या आंदोलनामुळे माझ्याविरोधात कट रचण्यात आला. मी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवला आहे. फीवाढ आणि विद्यापीठ प्रशासनामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळेच माझी पदवी रद्द करण्यात आली. मी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, मला न्याय देण्यात यावा.
या वादादरम्यान, पोली प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप केला. तसेच विद्यार्थ्यांना शांत करून तिथून हटवले. तर कुलगुरू रमेशचंद्र हे कुठलीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले. कुलगुरू रमेशचंद्र यांच्याविरोधात आधीही अनेक आमदार आणि विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.