संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही दिवसातच उपराष्ट्रपतीपदाचा जयदीप धनखड यांनी राजीनामा दिला. यानंतर दुसऱ्या दिवशीपासून धनखड सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. विरोधक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. आता काँग्रेसने तेलुगू माध्यमांचा हवाला देत दावा केला आहे की धनखड यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावर सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. धनखड यांनी आरोग्याच्या समस्येचे कारण देत राजीनामा दिला होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोमवारी धनखड यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, 'माजी राज्यसभा अध्यक्ष २१ जुलैच्या संध्याकाळपासून बेपत्ता आहेत. त्यांना ना पाहिले गेले, ना ऐकले गेले, ना वाचले गेले.' 'पण तेलुगू माध्यमांमधील वृत्तांनुसार, माजी राज्यसभा अध्यक्षांनी अलीकडेच पंतप्रधानांची ४५ मिनिटे भेट घेतली. काय चालले आहे?', असा सवाल त्यांनी यामध्ये केला.
विरोधकांनी जगदीप धनखड यांच्यावरुन प्रश्न उपस्थित केले
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जगदीप धनखड यांच्याबाबत सरकारला प्रश्न विचारले आहेत. १० ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात राऊत म्हणाले, 'आमच्या माजी उपराष्ट्रपतींबद्दल काहीही माहिती नाही. ते सध्या कुठे आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? या गोष्टींबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत अशा अफवा आहेत की धनखड यांना त्यांच्या घरातच कोंडून ठेवण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही, जो गंभीर चिंतेचा विषय आहे,' असा दावा राऊतांनी केला. 'आपल्या माजी उपराष्ट्रपतींना काय झाले आहे? ते कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा देशाला अधिकार आहे, असंही राऊत म्हणाले.
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दिला राजीनामा
धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राजीनामा दिला. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन राजीनामा सादर केल्याचे वृत्त आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे धनखड यांना राजीनामा द्यावा लागला, अशा चर्चा सुरू आहेत.