दिल्ली कँट परिसरात रविवारी झालेल्या भीषण बीएमडब्ल्यू कार अपघातात जखमींना २२ किलोमीटर दूर असलेल्या जीटीबी नगर येथील रुग्णालयात का नेण्यात आले, याचा खुलासा आता पोलीस तपासात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रुग्णालय आरोपी गगनप्रीतच्या आतेभावाचे आहे.
पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयाचा एक भाग ग्रेटर कैलाश येथे देखील आहे आणि गगनप्रीतचे वडील जयविंद्र देखील त्यामध्ये भागीदार आहेत. यामुळेच, अपघात झाल्यानंतर आरोपीने जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्याऐवजी, आपल्या नातेवाईकांच्या रुग्णालयात नेले.
पोलिसांना फोन का केला नाही?अपघातानंतर गगनप्रीत आणि तिच्या पतीने पोलिसांना फोन का केला नाही, याचा तपास पोलीस करत आहेत. जर पोलिसांना वेळेवर माहिती मिळाली असती, तर त्यांनी जखमींना काहीच अंतरावर असलेल्या आर्मी बेस रुग्णालयात नेले असते आणि कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पतीचा मृतदेह पाहून पत्नी ढसाढसा रडली!अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजोत सिंह यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमार्टम नंतर वेंकटेश्वर रुग्णालयात आणला गेला, जिथे त्यांची पत्नी संदीप कौर उपचारांसाठी दाखल आहेत. पतीचा मृतदेह पाहताच संदीप कौर यांना अश्रू अनावर झाले आणि त्या बेशुद्ध पडल्या.
आरोपीच्या पतीची चौकशीमंगळवारी दिल्ली कँट पोलीस ठाण्याचे अधिकारी आरोपी गगनप्रीतचा पती परीक्षित याची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मात्र, डॉक्टरांनी पोलिसांना सविस्तर चौकशी करू दिली नाही. पोलिसांच्या मते, परीक्षितवर पुरावे आणि माहिती लपवल्याचा आरोप आहे.
या अपघातात वित्त मंत्रालयात उपसचिव असलेले ५२ वर्षीय नवजोत सिंह यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हे दाम्पत्य आरके पुरममध्ये जेवण करून हरि नगरमधील आपल्या घरी परत जात असताना हा अपघात घडला होता.