संपूर्ण जगावर पसरले आहे दहशतवादाचे सावट - पंतप्रधान मोदी
By Admin | Updated: November 22, 2015 18:54 IST2015-11-22T12:43:25+5:302015-11-22T18:54:52+5:30
दहशतवादाची समस्या फक्त एका प्रदेशापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण जगावर दहशतवादाचे सावट पसरल्याचे सांगत त्याचा मुकाबला करण्यासाठी ‘आसिआन’ संघटनेतील देशांनी सहकार्य करावे, असे मोदी म्हणाले.

संपूर्ण जगावर पसरले आहे दहशतवादाचे सावट - पंतप्रधान मोदी
ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. २२ - दहशतवाद ही फक्त एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरती गौण समस्या राहिलेली नसून संपूर्ण जगावर दहशतवादाचे सावट पसरत असल्याचे सांगत दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी ‘आसिआन’ संघटनेतील देशांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले. क्वालालांपूर येथे ईस्ट एशिया समिटमध्ये ते बोलत होते. दक्षिण चीन सागरातील प्रादेशिक व सागरी वाद शांततेने मिटवावेत, असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले.
पॅरिस, अंकारा, बैरूत, माली येथील दहशतवादी हल्ले तसेच सिनाई येथे दहशतवाद्यांनी पाडलेले रशियन विमान, या सर्व बाबींवरून हेच स्पष्ट होते की दहशतवादाची समस्या फक्त एका भागापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण जगावर त्याचे सावट पसरत आहे. दहशतवाद हे आपल्यापुढील मोठे आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी आपण नव्या योजना आखल्या पाहिजेत. 'आसिआन' देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य चांगले असले तरी ते प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले पाहिजे. त्यासाठी एक दहशतवादविरोधी सर्वंकष जाहीरनामा करावा, असे मोदी म्हणाले. जगातील कोणत्याही देशाने दहशतवादाचा वापर करू नये अथवा दहशतवादाला पाठिंबा देऊ नये, असेही मोदींनी यावेळी म्हटले. तसेच दक्षिण चीन सागरातील प्रादेशिक अथवा सागरी वाद शांततेच्या मार्गाने मिटवावेत असाही सल्ला मोदींनी यावेळी दिला.