पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र दौऱ्यावरून नुकतेच परतले आहेत. यानंतर, आता भारतीय नजनता पक्ष लवकरच आपल्या नव्या अध्यक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजप लवकरच आंतरिक निवड समितीची बैठक घेऊन अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख निश्चित करू शकतो. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी, एका केंद्रीय मंत्र्याचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. हे पक्षातील एक मजबूत नेते तथा पंतप्रधान मोदींच्याही अगदी जवळचे मानले जातात.
निवडणुकीच्या तारखेवर अंतिम निर्णय -खरे तर, भाजपच्या राष्ट्रीय निवड समितीची बैठक डॉ. के. लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यात पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीच्या तारखेसंदर्भातही अंतिम निर्णय घेतला जाईल. या समितीमध्ये बी.एल. संतोष आदी नेतेही उपस्थित असतील.
मनोहर लाल खट्टर यांचे नाव जवळपास नश्चित - माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. महत्वाचे म्हणजे, 90 टक्के खट्टर हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत, असा दावा पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या दोघांचाही खट्टर यांच्यावर विश्वास आहे. खट्टर यांच्याकडे संघटनात्मक अनुभवही दांडगा आहे. तसेच ते दीर्घकाळ संघ प्रचारकही राहिले आहेत.
1977 पासून संघाचे कार्यकर्त्ये -मनोहर लाल खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या ते करनालचे खासदार आहेत. ७१ वर्षीय खट्टर हे १९७७ पासून संघाशी जोडले गेले आहेत आणि १९९४ पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींसह हरियाणातही संघटना मजबूत करण्याचे काम केले. दरम्यान, जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्येच संपला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता.