कोण हा प्रदीप शर्मा ?
By Admin | Updated: September 22, 2014 04:36 IST2014-09-22T04:36:36+5:302014-09-22T04:36:36+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरू पाहणारे वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे

कोण हा प्रदीप शर्मा ?
गौरीशंकर घाळे, मुंबई
येत्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरू पाहणारे वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. शर्मा यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न चालविले असले तरी शिवसेना आणि भाजपाने त्यांना अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
प्रदीप शर्मा अंधेरी पश्चिमेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. महिनाभर त्यांनी तसे प्रयत्नही चालविले आहेत. अंधेरीत ठिकठिकाणी शर्मा यांचे बॅनर्स आणि पोस्टर्स झळकत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्रही त्यांनी चालविले आहे. स्वत:ला महायुतीचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्या शर्मांच्या उमेदवारीबाबत एकीकडे शिवसेना आणि भाजपा नेते मौन बाळगून आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही जोरदार विरोध चालविला आहे. अलीकडेच स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचे कळते.
शर्मा यांची वरिष्ठ भाजपा नेत्यांशी ऊठबस असली तरी युतीच्या जागावाटपात अंधेरीची ही जागा शिवसेनेकडे आहे. काही दिवसांपासून शर्मा विविध कार्यक्रमांत भाजपा नेत्यांची सोबत दिसत आहेत. मात्र शर्मा आणि भाजपासाठी मतदारसंघावरील दावा सोडण्यास शिवसेना तयार नाही. विशेष म्हणजे मागील तीन विधानसभा निवडणुकांत शिवसेनेला येथून पराभवाचा सामना करावा लागला होता. एन्काउंटरफेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्मांच्या प्रसिद्धीचा फायदा होणार की त्यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीचा फटकाच बसणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मतदारसंघ भाजपाला सुटल्यास वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी मिळविण्याचे आडाखे बांधण्यात येत होते. ही शक्यताही आता धूसर बनल्याने शर्मा स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करताहेत.