छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या हत्ती हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर, त्याच्या नुकसानभरपाईची रक्कम घेण्यासाठी तब्बल सहा महिला एकाच वेळी वन विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व महिला स्वतःला मृत व्यक्तीची पत्नी असल्याचा दावा करत आहेत. आता वन विभागासमोर खरी पत्नी कोण आणि नुकसानभरपाई कोणाला द्यायची, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
नेमकं प्रकरण काय?सदर व्यक्तीचं नाव सालिक राम टोप्पो असं आहे. काही दिवसांपूर्वी हत्तीच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सरकारने हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, सालिक रामच्या मृत्यूनंतर ही नुकसानभरपाईची रक्कम घेण्यासाठी सहा महिला त्यांच्या मुलाबाळांसह वन कार्यालयात पोहोचल्या.
या सर्व महिला सालिक राम टोप्पो यांच्या वेगवेगळ्या पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. सालिक रामने वेगवेगळ्या वेळी या सहा महिलांशी लग्न केलं होतं आणि तो प्रत्येकीसोबत दोन ते तीन वर्षे राहिला होता. या सर्व महिलांना सालिक रामपासून मुलेही आहेत. हत्तीच्या हल्ल्यापूर्वी तो चिमटा पाणी गावात त्याच्या एका पत्नीसोबत आणि तिच्या भागवत टोप्पो नावाच्या मुलासोबत राहत होता.
वन विभागाची भूमिकावन विभागाच्या एका अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सालिक राम टोप्पो यांची नुकसानभरपाई घेण्यासाठी ६ पत्नी आणि त्यांच्या मुलांसह काही जावईदेखील आले आहेत. या सर्वजणी नुकसानभरपाईची मागणी करत आहेत," असं अधिकाऱ्याने सांगितलं.
यावर उपाय म्हणून, वन विभागाने सर्व महिलांना लवकरात लवकर सालिक राम टोप्पो यांच्या पत्नी असल्याचा पुरावा देण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत नुकसानभरपाईची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. ज्या महिलेकडे आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे असतील, तिलाच ही नुकसानभरपाईची रक्कम दिली जाईल, असं वन विभागाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत सरपंचाची संमती आणि चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाईल, असंही अधिकाऱ्याने नमूद केलं आहे.