कोण आहेत चार भारतीय अंतराळवीर?; कठोर प्रशिक्षण झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:06 AM2024-02-28T06:06:16+5:302024-02-28T06:06:32+5:30

गगनयान मोहिमेसाठी कठोर प्रशिक्षण घेत असलेल्या हवाई दलाच्या चार वैमानिकांना २ हजार ते ३ हजार तासांच्या उड्डाणाचा मोठा अनुभव आहे

Who are the four Indian astronauts for gaganyan mission?; Hard training started | कोण आहेत चार भारतीय अंतराळवीर?; कठोर प्रशिक्षण झाले सुरू

कोण आहेत चार भारतीय अंतराळवीर?; कठोर प्रशिक्षण झाले सुरू

पलक्कड : गगनयान मोहिमेसाठी कठोर प्रशिक्षण घेत असलेल्या हवाई दलाच्या चार वैमानिकांना २ हजार ते ३ हजार तासांच्या उड्डाणाचा मोठा अनुभव आहे आणि त्यापैकी दोघांना प्रतिष्ठित ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले आहे. गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांमध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे.

अमृतकाळामध्ये चंद्रावर पाऊल 
पंतप्रधान म्हणाले की, अमृतकाळामध्ये भारतीय अंतराळवीर स्वत:च्या देशाच्या अंतराळयानातून चंद्रावर दाखल होतील. भारताच्या युवा पिढीत विज्ञानाची आवड वाढीला लागणार आहे. त्याचबरोबर २१ व्या शतकात भारत विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर नेतृत्व करणार आहे. 

अवकाश संशोधनात होणार प्रगत
मंगळापर्यंत पहिल्या प्रयत्नात पोहोचणाऱ्या देशांत भारताचा समावेश आहे. एकाच वेळी १०० हून अधिक उपग्रहांचे भारताने यशस्वी प्रक्षेपण केले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान यशस्वीरीत्या उतरविण्यात भारत यशस्वी झाला आहे. आदित्य एल-१ हा उपग्रह आता सूर्याचे निरीक्षण करत आहे. 

ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांचा जन्म केरळमधील तिरुवाझियाड येथे २६ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. त्यांनी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना एअर फोर्स अकॅडमीत त्यांना मानाची तलवार (स्वोर्ड ऑफ हॉनर) प्राप्त झाली होती. ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत १९ डिसेंबर १९९८ रोजी दाखल झाले. ते अ श्रेणीचे विमान प्रशिक्षक व विमान चालक असून, त्यांना आतापर्यंत ३ हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी एसयू-३०, एमकेआय, मिग-२१, मिग-२९, हॉक, डॉर्नियर, एन-३२ अशी विविध प्रकारची विमाने चालविली आहेत. युनायटेड स्टेट्स स्टाफ कॉलेजचेही ते माजी विद्यार्थी असून, त्यांनी प्रिमियर फायटर एसयू-३० स्क्वाड्रनचे नेतृत्व केले आहे. 
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील चेन्नई येथे १९ एप्रिल १९८२ रोजी झाला. ते एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना एअर फोर्स अकॅडमीमध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक व मानाची तलवार हे सन्मान मिळाले होते. ते हवाई दलाच्या सेवेत २१ जून २००३ रोजी रुजू झाले. ते विमान प्रशिक्षक असून, पायलट म्हणून त्यांना २९०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, डार्नियर, एएन-३२ आदी विमाने चालविली आहेत. ते वेलिंग्टनच्या डीएसएससीचे माजी विद्यार्थी आहेत. 

ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांचा जन्म प्रयागराज येथे १७ जुलै १९८२ रोजी झाला. ते एनडीएचे माजी विद्यार्थी असून, १८ डिसेंबर २००४ रोजी ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत रुजू झाले. ते विमान प्रशिक्षक, तसेच कुशल पायलट असून त्यांच्याकडे २ हजार तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डॉर्नियर, एएन-३२ अशी विविध प्रकारची विमाने चालविली आहेत. 
विंग कमांडर शुभांशू शुक्ला
विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा जन्म उत्तर प्रदेशातील लखनौ येथे १० ऑक्टोबर १९८५ रोजी झाला. ते एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत १७ जून २००६ रोजी दाखल झाले. ते फायटर कॉम्बॅट लीडर व कुशल पायलट आहेत. त्यांच्याकडे २ हजार तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी आजवर एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डॉर्निअर, एएन-३२ आदी प्रकारची विमाने त्यांनी चालविली आहेत. 

महिलांचा सहभागही महत्त्वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमात महिलांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चंद्रयान, गगनयान या मोहिमा महिला संशोधकांच्या सहभाग व योगदानाशिवाय यशस्वीच होऊ शकणार नाहीत. त्याचे प्रत्यंतर ‘चंद्रयान’च्या निमित्ताने आले आहे.

Web Title: Who are the four Indian astronauts for gaganyan mission?; Hard training started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.