जवान लढत असताना मशिदीमधून अतिरेक्यांचे कौतुक सुरु होते
By Admin | Updated: February 23, 2016 10:55 IST2016-02-23T09:57:00+5:302016-02-23T10:55:48+5:30
भारतीय जवान आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांशी दोन हात करत असताना इथल्या स्थानिक मशिदींमधून अतिरेक्यांचे गुणगान, कौतुक सुरु होते.

जवान लढत असताना मशिदीमधून अतिरेक्यांचे कौतुक सुरु होते
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २३ - तीन दिवस चाललेल्या पाम्पोर चकमकीत भारतीय जवान आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांशी दोन हात करत असताना इथल्या स्थानिक मशिदींमधून अतिरेक्यांचे गुणगान, कौतुक सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार फ्रेस्टाबाल, द्रांगबाल, कडलाबाल आणि सेमपोरा या भागातील मशिदींच्या लाऊडस्पीकरवरुन जाहीरपणे जवानांवर गोळया झाडणा-या अतिरेक्यांचे कौतुक सुरु होते. 'जागो, जागो सुबह हुई' तसेच स्वतंत्र काश्मीर आणि पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा या मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन देण्यात येत होत्या.
पाम्पोरमध्ये ज्या ठिकाणी चकमक सुरु होती तिथे शेकडो युवका गोळा झाले होते आणि ते चकमकीला विरोध करत होते. यावेळी सुरक्षापथकांबरोबर त्यांची झडपही झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी संध्याकाळी सुरु झालेली ही चकमक सोमवारी संध्याकाळी संपली. येथील शासकीय इमारतीत लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले पण या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले.