पोलिसांचा धाक गेला कुठे?
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:16+5:302015-02-14T01:07:16+5:30
हायकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंता

पोलिसांचा धाक गेला कुठे?
ह यकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंतानागपूर : समाजात उद्दामपणाची पातळी वाढत असल्याने व पोलिसांचा धाक हळूहळू कमी होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यात काही आरोपींनी गोंधळ घालून एका जणाला मारहाण केली होती. पोलिसांपुढेच असा प्रकार घडल्यामुळे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी व्यथित होऊन एकंदरित परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणातील आरोपींनी फिर्यादीसोबत तडजोड करून एफआयआर रद्द करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कायद्यातील तरतुदीनुसार अर्ज मंजूर केला पण, घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपी व फिर्यादीला २४ फेब्रुवारीपूर्वी वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालयात ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. ही रक्कम न भरल्यास पोलिसांनी आरोपींना अटक करून त्याची माहिती न्यायालयाला द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय भविष्यात अशाप्रकारचे उद्दाम वर्तन करणार नाही असे प्रतिज्ञापत्र व हमीपत्र दोन आठवड्यांत न्यायालयात सादर करण्यास आरोपींना सांगण्यात आले आहे. आरोपींना याचिकेचा खर्च म्हणून ५ हजार रुपये भरण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. आरोपींना धडा मिळावा यासाठी अशाप्रकारचे आदेश देणे आवश्यक आहे. परंतु, यानंतरही आरोपी भविष्यात गोंधळ घालणार नाही याची आम्हाला खात्री नसल्याचे मत न्यायालयाने एकूण चित्र लक्षात घेता व्यक्त केले आहे. --------------------काय आहे प्रकरण८ नोव्हेंबर २०१४ रोजी अरुण मगर व इतर चौघांनी उमेश सरनाईक याला वाईन बारमध्ये मारहाण केली. यामुळे उमेश पळून पोलीस ठाण्यात आला. आरोपी लोखंडी पाईप घेऊन मोटरसायकलने पोलीस ठाण्यात पोहोचले व पोलिसांपुढे उमेशला मारहाण केली. यामुळे टेबलवरील काच फुटला. यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १४३, १४८, १४९ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला.