सिन्हांनी घोटाळेबाजांना भेटताना तपास चमूला ठेवले अंधारात
By Admin | Updated: September 15, 2014 03:00 IST2014-09-15T03:00:47+5:302014-09-15T03:00:47+5:30
सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी घोटाळ्यातील लोकांना भेटताना कनिष्ठ अधिकारी किंवा तपासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चमूला विश्वासात घेतले नाही.

सिन्हांनी घोटाळेबाजांना भेटताना तपास चमूला ठेवले अंधारात
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी घोटाळ्यातील लोकांना भेटताना कनिष्ठ अधिकारी किंवा तपासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चमूला विश्वासात घेतले नाही.
सिन्हांच्या गुप्त भेटीगाठी गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सीआयपीएल या स्वयंसेवी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होत असून सिन्हा आपली भूमिका स्पष्ट करतील. व्हिजिटर्स डायरीबाबात सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार आणि त्याअनुषंगाने संभाव्य घडामोडींवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आढावा घेण्याची तयारी चालविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिन्हांना दोषी मानल्यास त्यांच्या भवितव्यावरही परिणाम होऊ शकतो. सीबीआयसारख्या संचालकांची याआधीही कधीही छाननी झाली नसल्याकडे डीओपीटीच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने लक्ष वेधले. सिन्हांच्या निवासस्थानी त्यांना कोण कोण भेटले याची यादीच सीआयपीएलने सादर केली आहे. २ जी स्पेक्ट्रम, कोलगेट, खाण, रेल्वे आणि अन्य प्रकरणात सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे. या अभ्यागतांना सिन्हा यांनी ‘वैयक्तिक मित्र’ संबोधल्याने प्रशांत भूषण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या भेटीतील संभाषण सिन्हांनी रेकॉर्ड केलेले नाही. त्यांनी मौखिक माहितीही दिली नाही. ते पोलीस मॅन्युएलचे उल्लंघन मानले जाते. तपासावर निगराणी ठेवणााऱ्या सिन्हांसारख्या अधिकाऱ्याने आरोपींसोबत होणाऱ्या चर्चेबाबत आपल्या तपास चमूला विश्वासात घेणे आवश्यक होते, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.