मेहदी हसन यांचा मकबरा कधी बांधणार?
By Admin | Updated: June 12, 2015 23:51 IST2015-06-12T23:51:35+5:302015-06-12T23:51:35+5:30
विख्यात गझल सम्राट मेहदी हसन यांचे आप्तेष्ट मागील तीन वर्षांपासून त्यांचा मकबरा कधी बांधणार याची प्रतीक्षा करीत आहेत.

मेहदी हसन यांचा मकबरा कधी बांधणार?
नवी दिल्ली : विख्यात गझल सम्राट मेहदी हसन यांचे आप्तेष्ट मागील तीन वर्षांपासून त्यांचा मकबरा कधी बांधणार याची प्रतीक्षा करीत आहेत. एवढेच नाही तर लाहोरमधून चोरीला गेलेल्या त्यांच्या अमूल्य ठेवींचा अद्याप थांगपत्ता नाही.
शहेनशाह-ए-गझलचा शुक्रवारी तिसरा स्मृतिदिन होता; परंतु अनेकदा आश्वासन देऊनही कराचीत त्यांचा मकबरा बांधण्याचे काम अद्याप सुरूझालेले नाही. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी लाहोरमधून त्यांचे संपूर्ण सामान चोरीला गेले. यात त्यांना मिळालेले पुरस्कार, सन्मान, मृत्यू प्रमाणपत्र, हार्मोनियम, गझलांची हस्तलिखिते आणि कपड्यांचा समावेश आहे.
मेहदी हसन यांचे पुत्र आरिफ मेहदी यांनी कराचीतून वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपल्या कटू भावना व्यक्त केल्या. अब्बांना जाऊन तीन वर्षे झालीत; परंतु अजूनही त्यांच्या मकबऱ्याचे काम सुरू झालेले नाही. यासंदर्भात केंद्र, राज्य सरकार, गव्हर्नर सर्वांनी आम्हाला आश्वासन दिले; परंतु त्याची पूर्तता मात्र कुणी केली नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त
केली.
गझल सम्राटाच्या चोरीला गेलेल्या वस्तूंसाठी गेल्या तीन महिन्यांपासून आरिफ आणि त्यांच्या पत्नी पोलीस आणि नेत्यांकडे सतत घिरट्या घालत आहेत. आरिफ यांच्या पत्नी उमैमा आरिफ यांनी याप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात याचिकासुद्धा केली आहे.
आरिफ यांनी मेहदी हसन यांचे संपूर्ण सामान कराचीतून लाहोरला आणले होते. येथे एका संग्रहालयात या सर्व स्मृती जतन करण्याची त्यांची मनीषा होती. लिटन रोडवर एका भाड्याच्या घरात त्यांनी या सर्व वस्तू ठेवल्या होत्या. तेथूनच त्या चोरीला गेल्या. आरिफ यांनी चोरीचा शोध लागावा यासाठी पंतप्रधानांपासून सर्वांकडे धाव घेतली; परंतु कुणीही त्यांची दखल घेतली नाही, असा त्यांचा आरोप आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)