जेव्हा मनमोहन सिंग बनले पाकिस्तानचे राष्ट्रपती
By Admin | Updated: October 25, 2014 14:14 IST2014-10-25T10:23:23+5:302014-10-25T14:14:41+5:30
पाकिस्तानमधील एका वाणिज्य संस्थेने एका सोहळ्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव छापल्याने एकच खळबळ माजली आहे.

जेव्हा मनमोहन सिंग बनले पाकिस्तानचे राष्ट्रपती
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २५ - पाकिस्तानमधील एका वाणिज्य संस्थेने एका सोहळ्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव छापल्याने एकच खळबळ माजली आहे. या वाणिज्य संस्थेच्या दीक्षांत सोहळ्याच्या प्रवेशिकांवर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ' पाकिस्तानी इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती मनमोहन सिंग ' असे नाव छापण्यात आले आहे.
इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा (पीआयडीई) दीक्षांत सोहळा येत्या २८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाकिस्तानचे राष्ट्रपती मामनून हुसैन यांना आमंत्रित करण्यात येणार होते. मात्र त्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर हुसैन यांच्याऐवजी चुकून मनमोहन सिंग यांचे नाव छापले गेले, असे वृत्त दुनिया न्यूजने दिले आहे. तसेच या सोहळ्याची तारीखही चुकीची छापण्यात आली होती. २८ ऑक्टोबर ऐवजी २८ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पडेल असे त्यात लिहीण्यात आले होते.
ही चूक संबंधितांच्या लक्षात आली खरी, पण तोपर्यंत या पत्रिका अनेक मान्यवरांना पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर चूक सुधारून नवीन निमंत्रण पत्रिका छापून त्या निमंत्रितांकडे पाठवण्यात येतील. मात्र संबंधित अधिका-यांनी त्यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.