बुलेटप्रूफ जॅकेट कधी? सांगता येणार नाही
By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:51+5:302016-03-16T08:39:51+5:30
देशाच्या लष्कराला साडेसहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही बुलेटप्रूफ जॅकेट मिळालेले नाही. ते कधी मिळतील हे सरकार सांगण्याच्या स्थितीत नाही. राज्यसभेत खासदार विजय दर्डा

बुलेटप्रूफ जॅकेट कधी? सांगता येणार नाही
संरक्षणमंत्र्यानी हात वर केले : राज्यसभेत विजय दर्डा यांचा प्रश्न
नवी दिल्ली : देशाच्या लष्कराला साडेसहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही बुलेटप्रूफ जॅकेट मिळालेले नाही. ते कधी मिळतील हे सरकार सांगण्याच्या स्थितीत नाही. राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेले उत्तर धक्कादायक होते.
देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसंबंधी महत्त्वपूर्ण मुद्यावर सरकारने दाखविलेल्या बेपर्वावृत्तीचा हा खास नमुना म्हणावा लागेल. अकराव्या लष्कर योजनेनुसार(आर्मी प्लान) १ लाख ८६ हजार १३८ बुलेटप्रूफ जॅकेटचा पुरवठा केला जाणार होता. संरक्षण अधिग्रहण परिषदेने बुलेटप्रूफ जॅकेटची आवश्यकता आणि खरेदी या दोन बाबींना आॅक्टोबर २००९ मध्ये मंजुरी दिली होती. ज्या कंपनीकडून बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले जाणार होते ते चाचणीत अयोग्य ठरल्यामुळे किमान सहा वर्षांनंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.
प्रक्रियेनुसारच संरक्षण दलासाठी भांडवली खरेदी, संरक्षण खरेदी केली जाते. विविध टप्प्यांत ते काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादा सांगता येत नाही.
दारूगोळ्याची कमतरता...
दारूगोळ्याच्या कमतरतेकडे लक्ष वेधण्यात आले असता सरकारने त्याबाबत सल्लामसलत केली असल्याचे स्पष्ट केले. सध्याची युद्ध रणनीती बघता धोक्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे सैन्याची तयारी एका निश्चित स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली जात आहेत, असे उत्तर सरकारने दिले आहे.