मंगळसूत्र घालावं का? प्रश्न विचारणा-या टिव्ही कार्यालयावर बॉम्बहल्ला !
By Admin | Updated: March 12, 2015 16:25 IST2015-03-12T16:08:12+5:302015-03-12T16:25:02+5:30
महिलांनी मंगळसूत्र घालायला हवं का? असा प्रश्न उपस्थित केल्यानं न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर एका हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॉम्बहल्ला केला आहे.

मंगळसूत्र घालावं का? प्रश्न विचारणा-या टिव्ही कार्यालयावर बॉम्बहल्ला !
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १२ - हिंदू संस्कृतीत मंगळसूत्राला विशेष असं स्थान असताना महिलांनी मंगळसूत्र घालायला हवं का? असा प्रश्न उपस्थित करीत या विषयी एका न्यूज चॅनेलने चर्चा (डिबेट )केल्यानं न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर एका हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे.
चेन्नईतील तमीळ भाषेतील 'पुथीया थालाईमरई' असे न्यूज चॅनेलचे नाव असून या चॅनेलने जागतिक महिला दिनानिमित्त 'महिलांनी मंगळसूत्र घालावं का? याविषयी चर्चाचे आयोजन केले होते. मंगळसूत्र घालण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने संतापलेल्या आयगनार सेनेच्या चार कार्यकर्त्यांनी बुधवारी मोटारसायकलवर येवून टिफिन बॉक्सच्या साहाय्याने गावठी बॉम्बद्वारे ऑफिसवर हल्ला केला. या हल्याची जबाबदारी या कार्यकर्त्यांनी स्वीकारली असून त्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपणही केले आहे. पुथीया थालाईमरई या चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीयू शाम कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, साधारणत: ३.१५ वाजता दोन मोटारसायकलवर अज्ञात चार जण आले व त्यांनी बॉक्सेसमधून कार्यालयावर गावठी बॉम्ब फेकले. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. आमच्या टिव्हीवर 'थाली' आणि 'मंगळसूत्र' या दोन अशा चांगल्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. परंतू या विषयाला आक्षेप घेत काही हिंदूवादी संघटनांनी कार्यालयावर हल्ला चढवला. या हल्याची तीवृता कमी असली तरी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध नोंदवित असल्याचे शाम कुमार यांनी म्हटले आहे.