नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेल्या एका काळ्या रंगाच्या ट्रंकने संशय निर्माण केला असून सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकाराकडे लक्ष वेधून घेतले आहे. हे काय गौडबंगाल आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली असून पंतप्रधानांनी यावर खुलासा करावा, असे आवाहनही केले आहे. यावर अन्य राजकीय पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केली असून कर्नाटक काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे शनिवारी तक्रारही दाखल केली आहे. काँग्रेसने शुक्रवारीच या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन माणसे एक काळ्या रंगाची ट्रंक हेलिकॉप्टरमधून उतरवत असून पंतप्रधानांच्या ताफ्यामधून बाजूला असलेल्या एका खासगी गाडीतून ती दूर नेत असल्याचे दिसत आहे.युवा काँग्रेसचे नेते श्रीवास्तव यांनी ट्वीट केले असून ही संशयित काळी ट्रंक पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमधून कशी काय उतरविली आणि वाट पहात थांबलेल्या ताफ्यामधून कशी काय वेगाने दूर नेली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही ट्रंक पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग कशी काय बनली नाही, असाही सवाल त्यांनी केला.
मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या ट्रंकचे काय आहे गौडबंगाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:43 IST