चेन्नई: संसदीय सीमांकनाचा दक्षिणेकडील राज्यांवर परिणाम होणार नाही, असे भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी केलेले दावे महत्त्वाचे नाहीत. पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देशाला काय सांगत आहेत हे महत्त्वाचे आहे, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी सांगितले.
बंगळुरूला रवाना होण्यापूर्वी येथे पत्रकारांशी बोलताना कर्नाटक काँग्रेस प्रमुखांनी अन्नामलाईंवरही टीका केली. ते म्हणाले की, ते तामिळनाडूशी नाही तर ‘पक्षाशी एकनिष्ठ’ आहेत. येथे अन्नामलाई महत्त्वाचे नाहीत, पंतप्रधान आणि गृहमंत्री देशाला काय सांगत आहेत हे महत्त्वाचे आहे. बिचाऱ्या अन्नामलाईंना काहीही माहिती नाही. ते फक्त त्यांचे काम करत आहेत. ते त्यांच्या राज्याशी निष्ठा दाखवत नाहीत, ते त्यांच्या पक्षाशी निष्ठा दाखवत आहेत,’ असा आरोप शिवकुमार यांनी केला. ते शनिवारी तामिळनाडूत झालेल्या ‘निष्पक्ष सीमांकन’ बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे आले होते. (वृत्तसंस्था)
द्रमुकची सीमांकन बैठक ‘मोठे नाटक’: अण्णा द्रमुक
- सत्ताधारी पक्षातील ‘कमतरता लपवण्यासाठी’ सीमांकन बैठक ही ‘मोठे नाटक’ आहे, अशी टीका तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष, अण्णा द्रमुकने रविवारी संसदीय सीमांकनावर झालेल्या बैठकीबद्दल द्रमुकवर केली.
- अण्णा द्रमुकचे प्रवक्ते कोवई सत्यान म्हणाले की, स्टालिन यांनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की, ते सीमांकनाविरुद्ध नव्हते. दुसरीकडे, प्रत्येक ठिकाणी द्रमुक सीमांकन प्रक्रियाच चुकीची आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर खरे काय?