मोदींची लाट कायम अाहे तर इतक्या सभांची गरज काय? उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 1, 2014 14:43 IST2014-10-01T13:29:30+5:302014-10-01T14:43:16+5:30
नरेंद्र मोदींची लाट अद्याप कायम असेल तर भाजपाला राज्यात त्यांच्या इतक्या सभा घेण्याची गरज का वाटते असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदींची लाट कायम अाहे तर इतक्या सभांची गरज काय? उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - महाराष्ट्रात मोदींची लाट, करिश्मा अद्याप कायम असेल तर भाजपाला त्यांच्या इतक्या सभा घेण्याची गरज का वाटते असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता भाजपाने राज्यात नरेंद्र मोदींच्या जास्तीत जास्त सभा आयोजित केल्या आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी एखाद्या राज्यात इतक्या सभा घेतल्याचे चित्र दिसले नसल्याचे सागंत हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र नव्हे, राज्यातील जनता डोळस असून ती योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युती नेमकी का तुटली याचे कारण मला अजूनही कळलेले नसून इतर राज्यांतही युती का संपुष्टात आली याचा भाजपाने विचार करावा असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. युती हिंदुत्वाच्या मुद्यावर होती जागावाटपाच्या नव्हे असे सांगत आपण युती तोडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपावर टीका करण्याची माझी इच्छा नाही, ती माझी संस्कृतीही नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान केंद्रातून बाहेर पडण्याबाबत घटकपक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ त्यांनी यावेळी सांगितले. तर मंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे अनंत गीते यांनी स्पष्ट केले आहे.
यंदा दसरा मेळावा भाषणाविना
दस-याच्या दिवशी 'शिवतीर्थावर' विचारांचे सोने लुटायला येणा-या शिवसैनिकांची यावर्षी मात्र निराशा होणार आहे. यंदाच्या मेळाव्यात कोणतेही भाषण होणार नसून फक्त शस्त्रपूजन आणि होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यात लागलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.