Chennamaneni Ramesh citizenship case: जर्मन नागरिक तरीही भारतात चार वेळा आमदार बनलेल्या तेलंगणातील चेन्नामनेनी रमेश यांच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यात चेन्नामनेनी अपयशी ठरले. त्यांच्या नागरिकत्वसंदर्भात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. न्यायालयाने ते जर्मन नागरिक असल्याचे स्पष्ट करत ३० लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
चेन्नामनेनी रमेश यांना उच्च न्यायालयात झटका बसला. त्यांची भारतीय नागरिकत्वाशी संबंधित याचिका आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
चेन्नामनेनी रमेश नागरिकत्व प्रकरण काय?
चेन्नामनेनी रमेश यांनी 2019 मध्ये केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याच्या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण, ही याचिका फेटाळून लावत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांना ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
उच्च न्यायालयाने आदेश दिले की, २५ लाख रुपये वेमुलावाडाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार आदि श्रीनिवास यांना देण्यात यावे आणि उर्वरित पाच लाख रुपये तेलंगणा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाला द्यावे.
तेलंगणा काँग्रेस सरकारमधील आदि श्रीनिवास यांनी २००९ मध्ये रमेश यांच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी चेन्नामनेनी यांच्या दाव्यांना आव्हान देत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एक पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. चेन्नामनेनी यांच्याकडे जर्मनीचे नागरिकत्व होते आणि त्यांनी ३१ मार्च २००८ रोजी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता.
उच्च न्यायालयाने चेन्नामनेनी यांच्या नागरिकत्वाबद्दल काय म्हटलं?
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना म्हटलं की, चेन्नामनेनी हे असा एकही दस्ताऐवज सादर करू शकले नाही, ज्यावरून हे सिद्ध होईल की ते जर्मनीचे नागरिक नाहीत. माजी आमदार रमेश यांनी अनेक वेळा जर्मनीचा दौरा केला आहे आणि जर्मनीचे नागरिकत्व असतानाही ते वेमुलावाडा मतदारसंघातून आमदार राहिले.
कोण आहेत चेन्नामनेनी रमेश?
बीआरएसचे नेते चेन्नामनेनी रमेश हे राजेश्वर राव यांचे सुपुत्र आहेत. राजेश्वर राव हे तेलगू देसम पार्टीत जाण्यापूर्वी अविभाजित आंध्र प्रदेश राज्यात सीपीआयचे गटनेते होते. चेन्नामनेनी रमेश २००९ मध्ये तेलगू देसम पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा वेमुलावाडा मतदारसंघातून आमदार बनले.
त्यानंतर २०१० मध्ये तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली आणि जिंकले. पुढे २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते.