West Bengal Assembly Election 2026 : पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार टीका केली. बंगालमध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली असून, घुसखोरांना बाहेर काढले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच टीएमसीवर भ्रष्टाचार, हिंसा आणि कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोपही त्यांनी केला.
टीएमसीवाले घाबरले...
मोदी म्हणाले की, कूचबिहारमधील सभा ही बंगालमधील जनतेच्या बदलाच्या मनःस्थितीचे प्रतीक आहे. राज्यात टीएमसीच्या भ्रष्टाचार, हिंसा आणि प्रशासनातील अपयशामुळे जनतेमध्ये मोठा संताप आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्यातील ब्रिगेड ग्राउंडवरून बंगालमध्ये परिवर्तन महाअभियानाची सुरुवात करण्यात आली होती. त्या सभेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून टीएमसी घाबरली आहे आणि आता कूचबिहारच्या सभेने त्या परिवर्तनाच्या बिगुलावर शिक्कामोर्तब केले आहे.
निवडणुकीनंतर कारवाईचा इशारा
मोदी यांनी टीएमसीवर आरोप करताना म्हटले की, एकीकडे टीएमसीचे कटमनी, भ्रष्टाचार आणि सिंडिकेट राज आहे, तर दुसरीकडे विकास आणि विश्वास देणारी भाजप आहे. निवडणुकीनंतर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल. ४ मेनंतर कायदा आपले काम करेल. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी यावेळी न्याय होणार, असे आश्वासन पीएम मोदींनी दिले.
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा
मोदींनी संदेशखाली प्रकरणाचा उल्लेख करत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी भाजप सरकार काम करेल. देशातील ३ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्यात आले. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना त्याचा फायदा मिळेल.
बंगाल एकेकाळी आघाडीवर होते...
एकेकाळी बंगालची गणना देशातील सर्वात विकसित राज्यांमध्ये केली जात असे. व्यापार, उद्योग, कला किंवा संस्कृती, असे कोणतेही क्षेत्र असो, बंगाल त्यात नेहमीच अग्रेसर होते. मात्र, त्यानंतरच्या काळात, आधी डाव्यांच्या राजवटीत आणि नंतर तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत या विकासाची झळाळी हळूहळू क्षीण होत गेली. पूर्वी बंगालमधील लोकांचे उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक होते; परंतु आता परिस्थिती इतकी खालावली आहे की, येथील सामान्य लोकांचे उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षाही खाली घसरले आहे. देशातील इतर राज्ये वेगाने प्रगती करत असताना, तृणमूल काँग्रेसने बंगालला मात्र मागे ढकलले, अशी टीकाही पीएम मोदींनी केली.
Web Summary : PM Modi criticized TMC in Bengal, alleging corruption and violence. He promised action after elections, focusing on women's safety and Bengal's development. Modi highlighted a wave of change.
Web Summary : पीएम मोदी ने बंगाल में टीएमसी की आलोचना करते हुए भ्रष्टाचार और हिंसा का आरोप लगाया। उन्होंने चुनाव के बाद कार्रवाई का वादा किया, महिलाओं की सुरक्षा और बंगाल के विकास पर ध्यान केंद्रित किया। मोदी ने परिवर्तन की लहर पर प्रकाश डाला।