भारताच्या सुरक्षेविरोधातील गुप्त कारवायांमध्ये सामील असलेल्या एका संशयित हेराला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अटकेतील आरोपी, हसीन नावाचा रहिवासी, राजस्थानमधील डीग जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आला असून त्याच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम केल्याचा गंभीर आरोप आहे.
१५ वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेला अन्...
प्राथमिक तपासानुसार, हसीन १५ वर्षांपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी झालेल्या संपर्काच्या आधारे त्याने कालांतराने आयएसआयसाठी काम करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हसीनचा भाऊ कासिम याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्याच्याच चौकशीतून हसीनचे नाव पुढे आले.
सिम कार्डद्वारे उलगडले गुप्त जाळे
हसीनवर आरोप आहे की, त्याने भारतीय सिम कार्ड पाकिस्तानला पाठवली व व्हॉट्सअॅप अकाउंट सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेल्या ओटीपीची माहिती पुरवली. या सिम कार्डांचा वापर देशांतर्गत हेरगिरीसाठी करण्यात येत होता. शिवाय, त्याने देशातील काही संवेदनशील लष्करी परिसरांचे फोटोही पाकिस्तानी एजंटना पाठवल्याचे समोर आले आहे.
काही पैशांसाठी केली गद्दारी
पोलिसांच्या माहितीनुसार, हसीनला या कारवायांसाठी काही पैसे मिळाले होते. त्याने केवळ स्वतःच नव्हे, तर आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही पाकिस्तानचा व्हिसा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे हे नेटवर्क वैयक्तिक पातळीपुरते न राहता, एक व्यापक हेरगिरीचं जाळं बनलं होतं.
हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू
सध्या हसीनला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास यंत्रणा आता त्याच्याकडून पाकिस्तानला दिलेल्या माहितीचा तपशील आणि त्याने ज्या लोकांना या नेटवर्कमध्ये जोडले, त्याबाबत सखोल चौकशी करत आहेत.