लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांच्या सामानाच्या वजन व आकारासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहे. हे नियम विमानतळाच्या धर्तीवर असतील. आतापर्यंत हे नियम कागदोपत्री होते, परंतु आता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली जाणार आहे.
सुरुवातीला हे नियम उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या लखनौ आणि प्रयागराज मंडलांतील प्रमुख स्थानकांवर लागू होतील. लखनौ चारबाग, बनारस, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल, मिर्झापूर, अलीगढ, गोविंदपुरी आणि इटावा या ठिकाणी प्रवासात सोबत असणाऱ्या सामानाचे वजन करणारी यंत्रणा बसवली जाणार आहे. सामानाचे वजन तपासल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वजनाच्या किंवा मोठ्या आकाराच्या सामानावर अतिरिक्त शुल्क किंवा दंड आकारला जाईल.
रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार प्रत्येक प्रवाशाला ठरावीक प्रमाणात मोफत सामान नेण्याची मुभा आहे. ही मर्यादा प्रवासाच्या वर्गानुसार बदलते. मर्यादा ओलांडल्यास दीडपट शुल्क आणि नियमभंग झाल्यास ६ पट दंड आकारण्याची तरतूद नियमात आहे. १०० किलोपेक्षा जड किंवा ठरावीक मापांपेक्षा मोठ्या सामानाला ‘बल्की’ मानले जाते आणि त्यावर दुप्पट शुल्क आकारले जाते.याशिवाय धोकादायक, स्फोटक, दुर्गंधीयुक्त वस्तू तसेच गॅस सिलिंडर, आम्ले आणि मृत प्राणी यांसारख्या वस्तू रेल्वेतून नेण्यास बंदी आहे. वैद्यकीय कारणासाठी रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत नेण्याची परवानगी आहे.