Mohan Bhagwat Akhand Bharat: ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा उल्लेख करत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारत ध्येय पूर्ण करण्याचा निश्चय व्यक्त केला. आपणही वाटले गेलो, पण आपण ते पुन्हा परत मिळवू, असे मोहन भागवत म्हणाले आहेत. इंदूर येथील एका कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या 'परिक्रमा कृपा सार' या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी भारताचा विकास आणि भविष्याबद्दल भूमिका मांडली.
विन्स्टन चर्चिल म्हणाले होते भारत टिकणार नाही; पण...
मोहन भागवत म्हणाले, "ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते की, ब्रिटिश राजवट संपल्यानंतर भारत टिकणार नाही. विभागला जाईल. पण, असे झाले नाही. आता स्वतः इंग्लडचं विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे. पण, आपण वेगवेगळे झालो नाही. आपण पुढे जात राहू. आपण कधीतरी वाटले गेलो होतो, पण, आपण तेही परत घेऊन टाकू", असे भाष्य त्यांनी केले.
"भारतीयांच्या पूर्वजांनी अनेक धर्म, पंथांच्या माध्यमातून अनेक मार्ग दाखवले आहेत. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांची त्रिवेणी संतुलित आयुष्याचा प्रवाह सुरू ठेवते. जीवन जगण्याच्या या पारंपरिक मार्गावर भारतीय आजही श्रद्धा ठेवतात. त्यामुळेच सगळ्यांची भाकिते खोटी ठरतात आणि देश सातत्याने विकासाच्या मार्गाने पुढे जात आहे", असे प्रतिपादन भागवत यांनी केले.
३००० वर्षे भारत जगाच्या शिरपेचातील तुरा होता
सरसंघचालक म्हणाले, "आपापल्या स्वार्थामुळे जगात वेगवेगळे संघर्ष सुरू राहतात. त्यामुळे इतक्या समस्या समोर येतात. भारत ३००० वर्षे जगाच्या शिरपेचातील तुरा होता. तेव्हा जगात कोणताही संघर्ष नव्हता."
"भारतात गौमाता, नद्या आणि वृक्ष यांची पूजा केली जाते. त्यामाध्यमातून निसर्गाची उपासना केली जाते. निसर्गासोबतचे देशाचे नाते आचही जीवंत आहे. हे सगळं चैतन्याच्या अनुभूतीवर आधारलेलं आहे", असेही ते म्हणाले.
कुणाच्या पोटावर पाय देऊन शक्तिशाली बननं चुकीचं
"आज जग निसर्गासोबतच्या या नात्यासाठी तडफडत आहे. मागील ३००-३५० वर्षांमध्ये जगभरातील देशांना सांगितलं जात आहे की, लोग वेगवेगळे आहेत आणि जो शक्तिशाली आहे, तोच टिकणार आहे. त्यांना सांगितलं जात आहे की, कुणाच्या पोटावर पाय ठेवून किंवा कुणाचा गळा कापून जर ते शक्तिशाली बनू शकत असतील, तर ते बरोबर आहे", अशी खंत मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
"माणसासाठी ज्ञान आणि कार्य हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे आहेत. निष्क्रिय ज्ञानी कुणाच्याही कामाचा नाही. ज्ञानी लोक निष्क्रिय झाल्यामुळेच सगळी गडबड होते. जर कर्म करणाऱ्या व्यक्तीकडे ज्ञान नसेल, तर ते वेड्यांनी केलेले कर्म ठरते", असेही भागवत म्हणाले.