Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनात सिंह यांनी आज मध्य प्रदेशात BEML रेल्वे कारखान्याची पायाभरणी केली. यावेळी आयोजित सभेतून ऑपरेशन सिंदूरवर महत्वाचे भाष्य केले. 'आम्ही पहलगाम हल्ल्लाला चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही जगाला संदेश दिला की, आम्ही कोणाला छेडत नाही, पण जर कोणी आम्हाला छेडले, तर आम्ही त्याला सोडत नाही. आम्ही धर्म विचारून नाही मारत, आम्ही कर्म पाहून मारतो,' असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबीसंरक्षण मंत्री पुढे म्हणतात, 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारले होते, मात्र भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले, परंतु आम्ही त्यांचा धर्म विचारून नाही, तर कर्म पाहून मारले. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हा पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे आपण संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झालो. आज आपण भारतातही अशी शस्त्रे बनवत आहोत, जी आपण इतर देशांकडून खरेदी करायचो. आज भारताची संरक्षण निर्यात दरवर्षी सुमारे २४,००० कोटी रुपयांची झाली आहे, जी स्वतःच एक विक्रम आहे. हे क्षेत्र आता केवळ भारताची सुरक्षा मजबूत करत नाही, तर स्वतःची वाढ करण्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या वाढीलाही हातभार लावत आहे.'
संरक्षण मंत्र्यांची अमेरिकेवर टीकासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'काही लोक आहेत, जे भारताच्या विकासावर खूश नाहीत. त्यांना भारताचा विकास होत आवडत नाही. त्यांना वाटते की, 'आपण सर्वांचे मालक आहोत', मग भारत इतका वेगाने कसा वाढत आहे? हे लोक भारतात बनवलेल्या वस्तू त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तूंपेक्षा महाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की, या सर्वात भारत इतक्या वेगाने प्रगती करत आहे की, आता जगातील कोणतीही शक्ती भारताला महाशक्ती होण्यापासून रोखू शकत नाही,' असेही त्यांनी यावेळी सांगितले.