भाजपाचे नेते ब्रजेंद्र सैनी यांनी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासमोर रडत रडत आपली व्यथा मांडली. "त्यांनी आमचं दुकान फोडलं, आम्ही हात जोडले, फक्त पाच मिनिटं मागितली, आमचं सामान काढण्यासाठी फक्त थोडा वेळ द्या, पण या लोकांनी आमचे लाखो रुपये वाया घालवले. जेव्हा आम्ही बाजारातून परतलो तेव्हा आमचा भाऊ खूप अस्वस्थ झाला. आम्ही त्याला खूप समजावून सांगितलं, खूप समजावून सांगितलं..." असं सैनी यांनी म्हटलं.
सैनी यांच्या भावाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली कारण प्रशासनाने मुरादाबादमध्ये या लोकांच्या दुकानावर बुलडोझर चालवून ते उद्ध्वस्त केलं होतं. बुलडोझर चालवण्यापूर्वी नोटीस द्यायला हवी होती. मुरादाबादला आलेले उपमुख्यमंत्री पाठक म्हणाले की, भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हे प्रकरण माझ्या निदर्शनास आणून दिलं आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. या दुःखद आणि दुर्दैवी घटनेतील कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या दुःखाच्या वेळी सरकार पीडित कुटुंबासोबत उभं आहे.
मुरादाबाद शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे एका भाजपा नेत्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. हे प्रकरण भाजपाचे नेते ब्रजेंद्र सैनी यांचे भाऊ चेतन सैनी यांच्या आत्महत्येचं आहे, जे वडिलांच्या दुकानात बसायचे. प्रशासनाने मंगळवारी पूर्वसूचना न देता बुलडोझर चालवल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये त्यांचे दुकानही अतिक्रमणाच्या कक्षेत आले. दुकानातील सामान काढून टाकण्याची त्यांची विनंती कोणीही ऐकली नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले आणि रात्री छतावरून उडी मारून आत्महत्या केली.
कुटुंबात शोककळा पसरली आहे, प्रशासनाच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संपूर्ण परिसरात दुःख आणि संतापाचं वातावरण आहे. कुटुंबाचा दावा आहे की, कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती किंवा कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. दुकानावर थेट बुलडोझर चालवण्यात आला होता. भाजपचे मंडल मंत्री ब्रिजेंद्र सैनी यांनी स्वतः ही संपूर्ण घटना रडत माध्यमांसमोर शेअर केली. त्यांनी सांगितले की, सामान काढण्यासाठी फक्त पाच मिनिटं मागितली होती. पण कोणीही ऐकलं नाही. लाखो रुपयांचं नुकसान झालं.